माजी सरपंच संदीप देसाई यांनी दिले पुरावे : वनविभागाचे कर्मचारी पहारा देण्यात अयशस्वी : वनमंत्री, वरिष्ठ अधिकाऱयांकडे करणार तक्रार
वार्ताहर / दोडामार्ग:
हेवाळे-बांबर्डे परिसरात दिवसाढवळय़ा हत्ती शेती-बागायतीचे नुकसान करत आहेत. आता तर गावातील मुख्य रस्त्यांवरून ते फिरत आहेत. वनविभाग पहारा देण्यात अयशस्वी ठरत असुन डय़ुटी योग्य पद्धतीने निभावत नसल्याने या संदर्भात वनमंत्र्यांसह वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱयांकडे तक्रार करणार असल्याचे माजी सरपंच संदीप देसाई यांनी सांगितले. तसेच हत्तींच्या मुक्त संचाराचे फोटोही सादर केले.
सध्या दोडामार्ग तालुक्यात तिलारी खोऱयात हत्तींच्या कळपाचे आगमन झाले आहे. त्यात दोन पिल्ले व एका मादीचा सामावेश आहे. दिवसाढवळय़ा हा कळप लोकवस्तीत फिरतो. तर दोडामार्ग-कोल्हापूर राज्यमार्गावर अनेकदा या हत्तींचे दर्शन घडले आहे. त्यामुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत. असे असले तरी वनविभाग याकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप हेवाळे गावचे माजी सरपंच संदीप देसाई यांनी केला आहे. सायंकाळी सात वाजता हत्तींना पिटाळण्यासाठी गस्तीपथक तैनात करण्यात आले. मात्र, कर्मचारी सायंकाळी 7 ऐवजी रात्री दहाला गावात पोहोचतात. याबाबत वनक्षेत्रपालांचे लक्ष वेधूनही ते कामचुकार कर्मचाऱयांना पाठीशी घालतात. त्यामुळे आता वनमंत्र्याकडे तक्रार करणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.