बेंगळूर / प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मंगळवारी सांगितले की हनगल विधानसभा पोटनिवडणुकीत भाजप उमेदवाराचा पराभव हा खरे तर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांचा पराभव आहे, कारण हा मतदारसंघ त्यांच्या मूळ मतदारसंघात येतो.
३० ऑक्टोबर रोजी झालेल्या दोन विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीत, आज मतमोजणी झाली, त्यात भाजपचे रमेश भुसनूर यांनी सिंदगी जागेवर विजय मिळवला तर मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातील हावेरी येथील हनगल येथे काँग्रेसचे उमेदवार श्रीनिवास माने यांनी भाजपच्या शिवराज सज्जनार यांचा पराभव करत निवडणूक जिंकली.
ट्विटरवर एका ट्विटद्वारे काँग्रेसचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्र्यांनी भाजपवर निशाणा साधला. “हनगल निवडणुकीत भाजपचे खरे उमेदवार हे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई होते. त्यांच्या स्वत:च्या जिल्ह्यात भाजपचा पराभव झाला आहे. ‘मी या हनगल मातीचा पुत्र आहे, मी इथेच मरेन’ तसेच मी या भागाचा जावई आहे’, अशा भावनिक भाषणानंतरही जनतेने त्यांना नाकारले आहे.” असे सिद्धरामय्या यांनी ट्विट केले आहे.