वृत्तसंस्था/ सिडनी
येथे झालेल्या महिलांच्या बिग बॅश लीग टी-20 क्रिकेट स्पर्धेत मेलबर्न रेनेगेड्स संघाचे प्रतिनिधीत्व करणारी भारताची महिला क्रिकेटपटू हरमनप्रित कौरची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या स्पर्धेत मालिकावीराचा बहुमान मिळविणारी कौर ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू आहे.
या स्पर्धेत हरमनप्रित कौरने मेलबर्न रेनेगेड्स क्लबकडून खेळताना आपल्या अष्टपैलू कामगिरीचे प्रदर्शन घडविले. कौरने फलंदाजीत 399 धावा तर गोलंदाजीत 15 बळी घेतल्याने तिची मालिकावीर म्हणून निवड करण्यात आली. या स्पर्धेतील प्रत्येक सामन्यात पंचगिरी करणाऱया पंचांनी आपल्या मतदानाद्वारे मालिकावीराची निवड केली. या मतदानात कौरला 31 मते तर पर्थ स्कॉचर्सच्या बेथमुनी आणि सोफी डिव्हेनी यांना प्रत्येकी समान 28 मते त्याचप्रमाणे ग्रेस हॅरिसला 25 मते मिळाली. या स्पर्धेत लिचफिल्डची सर्वोत्तम युवा महिला क्रिकेटपटू म्हणून निवड करण्यात आली.