महिलेला अत्यंत दुर्लभ आजार
ब्रिटनच्या बर्मिंगहॅममध्ये राहणारी बेला किलमार्टिन दोन गंभीर आजारांना झुंज देत आहे. या आजारांमुळे तिला अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. बेला नारकोलेप्सी आणि केटाप्लेक्सी नावाचे दोन आजार तिला आहेत. या आजारांमुळे हसणे देखील अवघड होऊन बसेल असा विचारही बेलाच्या मनात शिवला नव्हता.
नारकोलेप्सीमध्ये माणसाला खूप झोप येते. तर केटाप्लेक्सीमध्ये स्ट्राँग इमोशन्स प्रभावी झाल्याने शरीरावर नियंत्रण सुटते. बेलाप्रकरणी हे इमोशन तिचे हास्य आहे. बेला हसू लागल्यावर तिच्या शरीरावर तिचे नियंत्रण राहत नाही आणि ती कित्येकदा हसत-हसत झोपी जाते.
हसल्यामुळे तिचे पूर्ण शरीर शटडाउन मोडमध्ये जाते. एकदा स्वीमिंग पूलमध्ये एका गोष्टीसाठी हसू लागल्यावर शरीरावर नियंत्रणच गेले आणि यानंतर बुडता-बुडता वाचले आहे. तेव्हापासूनच असुरक्षित ठिकाणी हसण्यावरून खूपच सतर्क राहत असल्याचे बेला सांगते.
कुणी एखादी मजेशीर गोष्टी सांगितल्यावर माझ्यासमोर समस्या उद्भवते. अशा स्थितीत मी हसल्यास माझ्या स्नायूंवरील नियंत्रण गमावून बसते. माझे पाय कमकुवत होतात, माझ्या डोक्याचे संतुलन बिघडायला लागते. माझ्या भोवती काय घडतंय हे समजत असले तरीही शरीरारील नियंत्रण गमावून बसते असे तिने सांगितले आहे.
केटाप्लेक्सी सुरू झाल्यावर मला हृदयविकार असल्याचे वाटत होते. पण ही समस्या हळूहळू सुरू झाली. मी जेव्हा हसायचे, तेव्हा मला चक्कर यायची. त्यानंतर माझे डोळे फडफडायचे आणि नशा केल्याप्रमाणे माझे डोळे व्हायचे. पण आता ही समस्या पुढील पातळीवर पोहोचली असून माझ्या शरीरावरील नियंत्रणच गमावते असे तिने म्हटले आहे.
मी अमली पदार्थांचे सेवन करत असल्याचे घरातल्यांना वाटायचे. कारण मी जेव्हा हसायचे तेव्हा माझे डोळे बरेच काही सांगून जायचे. मी या त्रासामुळे अनेकदा जखमी देखील झाल्याचे बेलाने सांगितले आहे.