महिलेला 240 कोटी रुपयांचा गंडा
हाँगकाँगमध्ये काही धूर्त चोरांनी एका 90 वर्षीय महिलेला 32 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच सुमारे 240 कोटी रुपयांचा गंडा घातला आहे. याला हाँगकाँगच्या इतिहासातील सर्वात मोठा फोन स्कॅम म्हटले जात आहे. ही महिला हाँगकाँगच्या प्रतिष्ठित महिलांमध्ये गणली जाते.
पोलिसांनी याप्रकरणी एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थ्याला अटक केली आहे. तसेच फोन स्कॅमर्सच्या खात्यातून 8 कोटी रुपये हस्तगत केले आहेत. पोलिसांनी हे खाते गोठविले असले तरीही फोन स्कॅमर्सने उर्वरित रक्कम लंपास केली आहे.
संबंधित महिलेला एक फोन आला होता आणि समोरील व्यक्तीने आपण कायदा अंमलबजावणी अधिकारी असल्याचे सांगितले होते. महिलेला तिच्या ओळखीचा वापर काही धोकादायक गुन्हेगार करत असल्याने मोठी समस्या र्माण होऊ शकते असे सांगण्यात आले होते. त्यानंतर महिलेला तिच्याकडील रक्कम बेकायदेशीर नसल्याबद्दल तपास करण्यासाठी ती हस्तांतरित करण्याचा सल्ला देण्यात आला. चीनच्या एका अत्यंत गंभीर गुन्हेगारी प्रकरणात तिचा वापर केला जात असल्याचे सांगण्यात आल्यावर महिला खूपच घाबरली होती.
चौकशीनंतर सर्व रक्कम परत केली जाणार असल्याचे तिला सांगण्यात आले होते. पण असे न घडल्याने महिलेला संशय आला आणि तिने त्वरित याची माहिती पोलिसांना दिली. काही काळापूर्वी प्लंकेट रोडवरील महिलेच्या घरी एक विद्यार्थी पोहोचला होता. या विद्यार्थ्याने महिलेला संपर्कासाठी फोनही दिला होता. याच क्रमांकावर या महिलेला स्कॅमरने फोन केला होता. महिलेने त्यानंतर 239 कोटी रुपये तीन खात्यांमध्ये जमा केले होते. महिलेने याकरता स्वतःच्या खात्यात 5 महिन्यांमध्ये 11 वेळा व्यवहार केले होते अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी कोवलुन ईस्ट रिजनल क्राइम युनिट तपास करत आहे. यापूर्वी युएन लाँगमध्ये राहणाऱया 65 वर्षीय महिलेलाही फोन स्कॅमर्सनी 64 कोटी रुपयांचा गंडा घातला होता.