गोकुळच्या रंगमंचावर कार्यकर्ते, नेते मात्र पडद्यामागे
कोल्हापूर / यशवंत लांडगे
`गोकुळ’ दूध संघाच्या राजकारणात पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार महादेवराव महाडिक यांच्यातील वादच केंद्रस्थानी आहे. जिल्हा बँक आणि गोकुळ दोन्ही बिनविरोध करण्याच्या हालचाली असल्या तरी सतेज पाटील आणि महाडिक यांच्या राजकीय दंगलीत जिह्याच्या राजकारणाची दोन गटात विभागणी झाली आहे. या वादात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार पी. एन. पाटील यांची भूमिकाही महत्त्वाची ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीचे राजकारण आणि गोकुळसाठीची नेत्यांची भूमिका यामध्ये झालेली गुंतागुंत सर्वसामान्यांच्या कल्पनाशक्तीच्या पलीकडे गेली आहे. कधी कोण एकत्र येईल आणि कधी कोण विरोधात जाईल, याचा काही नेम नाही. म्हणूनच गोकुळच्या सभेत होत असलेला गोंधळ म्हणजे भविष्यातील राजकारणाचा ट्रेलर असून निवडणुका जवळ येतील तसे पिक्चर स्पष्ट होईल. सध्या तरी कार्यकर्ते रंगमंचावर दिसत असून नेत्यांच्या हालचाली पडद्यामागून सुरु आहेत.
महाविकास आघाडीच्या निमित्ताने जिह्यात भाजप विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तीन पक्ष अशी राजकारणाची वरवर पक्षीय विभागणी झाली आहे. विधानसभा निवडणुकीत एकमेकांविरोधात दंड थोपटणारे नेते आता गोकुळ आणि जिल्हा बँक निवडणुकीच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसतील. मात्र ही आघाडी किती दिवस टिकणार यावरच राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने अनेकजण सावध आहेत. तालुकावार राजकीय समीकरणे पुढच्या विधानसभेच्या गणितामुळे गोकुळ निवडणुकीत पुन्हा घडणार की बिघडणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या पक्षातील नेते राजकीय व्यासपीठावर एकत्र असले तरी कार्यकर्त्यांत अजून सख्य नाही. जनसुराज्य पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे आणि महादेवराव महाडिक हे राजकीय प्रतिस्पर्धी गोकुळच्या निमित्ताने एकत्र येण्यासाठी हालचाली सुरु आहेत. गोकुळमध्ये महाडिकांच्या सोबत असलेले शिवसेनेचे माजी आमदार सत्यजित पाटील शाहूवाडी-पन्हाळ्यातील राजकारणासाठी कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. करवीरमध्ये आमदार पी. एन. पाटील आणि चंद्रदीप नरके या दोन गटातच निवडणुका होत असल्याने पी. एन. यांच्या निर्णयावरच नरके यांची गोकुळची भूमिका ठरेल. महाडिक यांच्या भाजपच्या भूमिकेवरुन संचालक मंडळात दोन गट आहेत.
कागल तालुक्यात मंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक एकत्र आले आहेत. गोकुळमध्ये विरोधी आघाडीला साथ देणारा संजय घाटगे गट बदललेल्या घडामोडीत कोणता निर्णय घेणार हे पाहावे लागेल. विरोधात निवडून येऊनही संचालक अमरिशसिंह घाटगे यांनी सत्ताधाऱयांशी आतापर्यंत जुळवून घेतले आहे. घाटगे केणासोबत जाणार हे अद्याप निश्चित नाही. मूळचे राष्ट्रवादीचे मात्र आता शिवबंधनात अडकलेले राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी अजून जिह्यातील राजकारणाची दिशा स्पष्ट केलेली नाही. गोकुळबाबतच्या त्यांच्या भूमिकेचा परिणाम शिरोळ तालुक्यातील राजकारणावर होणार आहे.
राधानगरी-भुदरगड-आजरा तालुक्यात आमदार प्रकाश आबिटकर आणि के. पी. पाटील, ए. वाय. पाटील गट गोकुळच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर येणार काय? हातकणंगलेत महाडिक विरोधात आमदार राजूबाबा आवळे आणि शिवसेनेचे डॉ. सुजित मिणचेकर अशा आघाडीची शक्यता आहे. माजी खासदार निवेदिता माने यांनी जिल्हा बँकेत सत्कार समारंभात मंत्री हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांच्या भूमिकेला जाहीर पाठिंबा दिला आहे. राजू शेट्टी यांची वाटचाल भाजपविरोधात असल्याने शेट्टी आणि खासदार धैर्यशील माने गोकुळच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर दिसल्यास आश्चर्य वाटणार नाही.
मंत्री हसन मुश्रीफ यांना गोकुळपेक्षा जिल्हा बॅंकेची एकहाती सत्ता महत्त्वाची आहे. त्यासाठी पी. एन. पाटील, महादेवराव महाडिक आणि पर्यायाने भाजपची मदत लागणार आहे. गोकुळमध्ये सत्तांतर झाल्यास पालकमंत्री सतेज पाटील यांचे राजकीय महत्त्व वाढणार आहे. त्यामुळेच मुश्रीफ यांची भूमिका महत्त्वाची आहे. सतेज पाटील यांनी महाडिक गटाविरोधात राजाराम कारखाना आणि गोकुळच्या निमित्ताने थेट आघाडी उघडली आहे. पी. एन. पाटील हीच गोकुळच्या सत्ताधारी आघाडीची ताकद आहे. त्यामुळे पाटील आणि महाडिक वादात मंत्री मुश्रीफ आणि पी. एन. पाटील यांची ताकदही खऱया अर्थाने दिसून येणार आहे.
एकूणच गोकुळची निवडणूक जवळ येईल तशी राजकीय आक्रमता वाढत चालली आहे. सध्या कार्यकर्ते किल्ला लढवत आहेत. तर नेते चाचपणी करत आहेत. हळुहळू नेतेही पुढे येतील आणि जिल्ह्याच्या राजकारणाला खऱया अर्थाने उकळी येणार आहे.
नाराज संचालकांच्या भूमिकेला महत्त्व
गोकुळचे ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील व अरुणकुमार डोंगळे यांच्या मौनाला सत्तारुढ गटातील धुसफुशीची किनार आहे. सध्याच्या परिस्थितीत विश्वास पाटील, डोंगळे आणि स्व. आनंदराव पाटील चुयेकर यांचे चिरंजीव शशिकांत पाटील या तिघांच्या भूमिकेला महत्त्व आहे. या तिघांनी स्वतंत्रपणे मतदार प्रतिनिधी ठराव दाखल केले. पाटील-डोंगळे ज्या बाजूला तिकडे आपण असे चुयेकरांनीही स्पष्ट केल्याने गोकुळ निवडणुकीत या संचालकांच्या भूमिकेला महत्त्व आहे.