प्रतिनिधी /बेळगाव
हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील आणखी एका कैद्याचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी दुपारी ही घटना घडली असून हृदयाघातानंतर उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला हलविताना जन्मठेपेची शिक्षा भोगणाऱया कैद्याचा मृत्यू झाला आहे.
कोट्रेश गणेशाप्पा हरपनहळ्ळी (वय 44) असे त्याचे नाव आहे. तो मूळचा हिरेहडगली (ता. हुवीनहडगली, जि. बळ्ळारी) येथील राहणारा होता. 2005 मध्ये बेंगळूर येथील हेब्बाळ पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात झालेल्या खून प्रकरणात त्याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती.
कोट्रेशला हिंडलगा येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्धतेत ठेवण्यात आले होते. गुरुवारी दुपारी त्याच्या छातीत कळा आल्याने कारागृहाच्या अधिकाऱयांनी त्याला तातडीने सिव्हिल हॉस्पिटलला हलविले. तेथे पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. एपीएमसी पोलीस स्थानकात या घटनेची नोंद झाली आहे.
एपीएमसीचे पोलीस निरीक्षक मंजुनाथ हिरेमठ हे पुढील तपास करीत आहेत. गेल्या आठवडय़ात केरळचा डॉन तस्लीम खून प्रकरणातील संशयित गुरुराज उर्फ गुरु दोडमनी (वय 28, रा. हुबळी) याचा मृत्यू झाला होता. 5 फेब्रुवारी रोजी रात्री ही घटना घडली होती. आठवडय़ाभरात आणखी एका कैद्याचा मृत्यू झाला आहे.