कोणत्याही प्रकारची लूट होऊ नये यासाठी आदर्श उपक्रम : नागरिकांतून स्वागत
वार्ताहर / हिंडलगा
तालुक्यातील बहुतांश ग्राम पंचायत कार्यालयांमधून किरकोळ कामांसाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक केली जाते. शासकीय दरपत्रक वेगळेच व पंचायतीची आकारणी वेगळीच असे प्रकार सर्रास घडतात. पण हिंडलगा ग्राम पंचायत याला अपवाद ठरली असून कार्यालयासमोर चक्क ठराविक कागदपत्रांचे दरपत्रक लावून नागरिकांची कोणत्याही प्रकारची लूट होऊ नये, याची खबरदारी घेण्यात आली आहे. त्यामुळे पंचायतीच्या निर्णयाबद्दल ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे.
नूतन सदस्यांची पहिलीच मासिक सभा शुक्रवार दि. 19 रोजी झाली. त्यामध्ये गावच्या विकासाबाबत सविस्तर चर्चा करून काही ठोस निर्णय घेतले. त्यामध्ये ग्राम पंचायत अध्यक्ष नागेश मन्नोळकर यांनी सर्वप्रथम पंचायत कार्यालयासमोर नागरिकांसाठी लागणारा संगणक उतारा, हात उतारा, रहिवासी दाखला, ना हरकत प्रमाणपत्र अशा महत्त्वाच्या कागदपत्रांचे शासकीय दरपत्रक काय आहेत. याबाबत सर्वसामान्य जनतेला माहिती मिळाली पाहिजे. कर्मचारी किंवा इतर कोणाकडूनही नागरिकांची आर्थिक फसवणूक होऊ नये, यासाठी कार्यालयासमोर संबंधित कागदपत्रांसाठी लागणारे दरपत्रक लावण्याची सूचना सभेत अधिकाऱयांना केली. त्यानुसार अधिकाऱयांकडून याची गांभीर्याने दखल घेतली. ग्रा. पं. कार्यालयासमोर विविध प्रमाणपत्रांचा दरफलक लावल्याचे दि. 20 पासून निदर्शनास येत आहे. त्यामध्ये संगणक उताऱयासाठी 100 रुपये, हात उतारा 10 रुपये, ना हरकत प्रमाणपत्र 50 व रहिवासी दाखला मोफत अशा प्रकारचे शासकीय दरपत्रकच लावले आहे. पंचायतीने घेतलेल्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. शिवाय तालुक्यातील इतर ग्राम पंचायतींनीदेखील याचा आदर्श घेऊन नागरिकांची होणारी लूट थांबविण्याची मागणी होत आहे.