आतापर्यंत ग्राम पंचायत हद्दीत 18 रुग्ण तर दोघांचा मृत्यू : नागरिकांनी दक्षता घेणे गरजेचे
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हय़ाबरोबरच आता तालुक्मयातही कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता प्रत्येक गावात दक्षता घेण्यात येत असून विशेषकरून ज्या गावांमध्ये अधिक रुग्ण आढळत आहेत, त्या गावात निर्जंतुकीकरण व इतर उपाययोजना हाती घेण्यात येत आहे. हिंडलगा परिसरात आतापर्यंत 18 रुग्ण आढळले असून दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत दक्षता घेण्यात येत आहे.
नुकतीच तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी हिंडलगा येथे भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. अजूनही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत 18 जणांना कोरोनाची लागण झाली असून लक्ष्मीनगर व विजयनगर परिसरातील दोघा जणांचा मृत्यू झाला आहे. हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील रुग्णांची जबाबदारीही हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत येणाऱया डॉक्टर, नर्स आणि ग्राम पंचायत कर्मचाऱयांवर सोपविण्यात आली आहे. या कारागृहात आतापर्यंत 27 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे यापुढे हिंडलगा ग्राम पंचायत क्षेत्रात दक्षता घेण्याची गरज व्यक्त होत आहे.
नियमांचे पालन करणे गरजेचे
परिसरात निर्जंतुकीकरण करण्यात आले असून आता अनेकांच्या आरोग्य तपासणीसाठीही पाऊल उचलण्यात येत आहे. तालुक्मयातील वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेव्हा जनतेने काळजी घेणे गरजेचे बनले आहे. रस्त्यावर विनाकारण फिरण्यापेक्षा प्रत्येकाने घरात राहणे योग्य ठरणार आहे. तोंडाला मास्क तसेच सामाजिक अंतर राखण्याच्या सूचनाही तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांनी केल्या आहेत. त्यामुळे यापुढे विनाकारण फिरणाऱयांनी दक्षता घेण्याची गरज निर्माण झाल्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
ग्राम पंचायततर्फे विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येत असून याबाबत ग्राम विकास अधिकारी गंगाधर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे. हिंडलगा ग्राम पंचायत हद्दीत रुग्ण वाढत असले तरी ते नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.