ऑस्ट्रेलियाच्या 9 बाद 337 धावांना उत्तर देताना इंग्लंड 8 बाद 235
कॅनबेरा (ऑस्ट्रेलिया) / वृत्तसंस्था
हिदर नाईटच्या झंझावाती शतकानंतरही महिला ऍशेस मालिकेतील एकमेव कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाचे वर्चस्व कायम राहिले आहे. मनुका ओव्हलवर सुरु असलेल्या या लढतीत ऑस्ट्रेलियाने आपला पहिला डाव 9 बाद 337 धावांवर घोषित केला. प्रत्युत्तरात शुक्रवारी दुसऱया दिवसअखेर इंग्लंडची 8 बाद 235 अशी स्थिती होती. शतकवीर नाईट 127 तर सोफी इक्लेस्टोन 27 धावांवर नाबाद राहिले.
शुक्रवारी ऑस्ट्रेलियाने 7 बाद 327 या पहिल्या दिवसाच्या धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर अवघ्या 10 धावांमध्ये आणखी 2 गडी गमावले आणि तेथेच त्यांनी डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. इंग्लंडचा संघ या सामन्यात अद्याप 102 धावांनी पिछाडीवर आहे.
यजमान ऑस्ट्रेलियाच्या 337 धावांना प्रत्युत्तर देताना इंग्लंडची खराब सुरुवात झाली आणि याचा त्यांना बराच फटका बसला. लॉरेन विनफिल्ड हिलला (4) डॅर्सी ब्राऊनने बाद केले, त्यावेळी संघाची 1 बाद 6 अशी स्थिती होती. टॅमी ब्यूमाऊंट देखील एलिस पेरीकरवी स्वस्तात बाद झाली. त्यानंतर कर्णधार नाईटने स्ट्राईक रोटेट करत धावफलक हलता ठेवण्यावर भर दिला. नंतर नताली स्कीव्हरने अनाबेल सुदरलँडची बरीच धुलाई केली.
पुढे, स्कीव्हरनंतर सोफिया डंकली (15) देखील बाद झाली. ऍमी इलेन जोन्सने नाईटसोबत छोटी भागीदारी केली. पण, ती देखील 13 धावांवर बाद झाल्यानंतर इंग्लंडचा निम्मा संघ 118 धावांमध्येच परतल्याचे स्पष्ट झाले. कॅथेरिन ब्रन्ट केवळ एका धावेवर बाद झाली. शार्लोट डीन व नाईट यांच्या भागीदारीमुळे इंग्लंडला कसेबसे 7 बाद 150 धावांपर्यंत पोहोचता आले. अनाया श्रबसोलही जोनासनच्या गोलंदाजीवर बाद झाली. दिवसातील शेवटच्या टप्प्यात इक्लेस्टोन व नाईट यांनी आणखी पडझड होऊ दिली नाही.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया ः 9 बाद 337 (मेग लॅनिंग 93, रॅशेल हेन्स 86, कॅथेरिन ब्रन्ट 5-60). इंग्लंड ः 8 बाद 235 (हिदर नाईट खेळत आहे 127, सोफी इक्लेस्टोन खेळत आहे 27. एलिस पेरी 2-35).