प्रतिनिधी / बेळगाव :
हिरेबागेवाडी व संकेश्वर येथील आणखी चौदा जणांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बेळगावला कोरोना संक्रमणाचा वेढा आणखी घट्ट होत चालला आहे. एकूण बाधितांची संख्या 69 वर पोहोचली आहे. सर्व चौदा जणांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे.
गुरुवारी दुपारी आरोग्य विभागाने प्रसिद्ध केलेल्या हेल्थ बुलेटिनमध्ये बेळगावच्या चौदा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचा उल्लेख होता. राज्यातील एकूण 22 जणांपैकी हिरेबागेवाडी येथील 11 व संकेश्वर येथील तिघा जणांचा समावेश आहे. सायंकाळच्या बुलेटिनमध्ये राज्यातील बाधितांची संख्या वाढून ती 30 झाली आहे.
कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संपर्कातून या चौदा जणांना बाधा झाली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार हिरेबागेवाडी येथील 24 वषीय महिला, 27 वषीय तरुण, 24 वषीय महिला, 18 वषीय तरुण, 48 वषीय महिला, 50 वषीय इसम, 27 वषीय महिला, 43 वषीय युवक, 16 वषीय मुलगा, 36 वषीय महिला व 36 वषीय युवकाला कोरोनाची लागण झाली आहे.
तर संकेश्वर येथील 9 वषीय बालिका, 75 वषीय वृद्धा व 8 वषीय बालिका यांचा समावेश आहे. बुधवारी रात्री उशिरा सर्व चौघा बाधितांना सिव्हिल हॉस्पिटलमधील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. उपलब्ध माहितीनुसार आतापर्यंत 69 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. यापैकी दहा जण कोरोनामुक्त झाले आहेत तर एका वृद्धेचा मृत्यू झाला आहे.
निजामुद्दिन मरकज कनेक्शनमुळे संख्येत वाढ
निजामुद्दिन मरकज कनेक्शनमुळे कोरोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. एका हिरेबागेवाडीत 25 जणांना कोरोनाची लागण झाली होती. यात गुरुवारी आणखी 11 जणांची भर पडली. त्यामुळे या एकाच गावातील एकूण बाधितांची संख्या 36 पोहोचली असून जिल्हय़ात हे गाव पहिल्या क्रमांकावर आहे. तर 19 रुग्णसंख्या असणारे कुडची दुसऱया क्रमांकावर आहे. संकेश्वर येथील बाधितांची संख्या पाचवर पोहोचली आहे.
गेल्या आठवडाभर बुलेटिनमध्ये बेळगावला दिलासा मिळत होता. मात्र, गुरुवारी अचानक चौदा जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. 3 एप्रिल रोजीच्या बुलेटिनमध्ये बेळगाव शहर व तालुक्मयातील तीन रुग्णांचा समावेश होता. 30 एप्रिलला महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही संख्या 69 वर पोहोचली. कोरोना थोपविण्यासाठी व्यापक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. तरीही संक्रमितांची संख्या वाढतच चालली आहे.
शासकीय यंत्रणेला खडबडून जाग
गुरुवारी एका दिवसात हिरेबागेवाडी येथील अकरा जणांचा अहवाल पॉझिटिव्ह येताच शासकीय यंत्रणेला खडबडून जाग आली आहे. पोलीस व महसूल खात्याच्या अधिकाऱयांनी हिरेबागेवाडीला धाव घेतली. या गावातील संक्रमण रोखण्यासाठी आणखी काय उपाययोजना कराव्यात, याबाबत चर्चा करण्यात आली. 16 एप्रिल रोजी बेळगाव जिल्हय़ातील 17 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. यामध्ये हिरेबागेवाडी येथील आठ जणांचा समावेश होता. त्यानंतरची ही पॉझिटिव्ह रुग्णांची दुसऱया क्रमांकाची मोठी संख्या आहे.
गुरुवारी सोशल मीडियावरून चौदा बाधितांची नावे व त्यांचा मोबाईल क्रमांक असलेली यादी व्हायरल झाली आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी फार भडकले होते. बाधितांची नावे गुप्त ठेवली जातात. मात्र, त्यांची नावे व मोबाईल क्रमांक असलेली यादी उघड झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
तबलिगी कनेक्शनमुळे संसर्ग वाढला
बेळगाव जिल्हय़ात मार्चअखेरपर्यंत एकही रुग्ण आढळून आला नव्हता. मात्र, निजामुद्दीन मरकजमधून परतलेल्या तबलिगींच्या संसर्गातून रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ झाली असून आता थेट संपर्काबरोबरच निकट सहवासातील लोकांनाही कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या आठवडय़ात पालकमंत्री जगदीश शेट्टर यांनीही अशीच माहिती दिली होती. तबलिगींमुळे बेळगावातील बाधितांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले होते. आरोग्य विभागाने जारी केलेल्या अहवालातही याचा उल्लेख आहे.
साखळी तोडण्याची गरज
कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊनचा पर्याय संपूर्ण देशाने स्वीकारला आहे. बेळगावातील 69 बाधितांत तबलिगी व त्यांच्या संपर्कातील लोकांचा समावेश आहे. ही साखळी तोडण्यासाठी दिल्लीहून परतलेल्यांनी स्वतःहून आपली आरोग्य तपासणी करून घेण्याची गरज आहे. जिल्हा प्रशासनाने वारंवार विनंती करूनही अनेकजण आजही तपासणी करून घेण्यास टाळत असल्याचे आढळून आले आहे. हिरेबागेवाडी येथील रुग्णसंख्या वाढल्याने आता सरसकट स्वॅब जमविण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे.