वॉशिंग्टन / वृत्तसंस्था :
डेमोक्रेटिक पार्टीच्या खासदार तुलसी गबार्ड यांनी अमेरिकेच्या माजी विदेशमंत्री हिलरी क्लिंटन यांच्याविरोधात 5 कोटी डॉलर्स (सुमारे 350 कोटी रुपये) चा अब्रू नुकसानीचा खटला दाखल केला आहे. हिलरी यांनी मागील वर्षी एका मुलाखतीत गबार्ड यांना लक्ष्य केले होते. रशियाच्या यंत्रणांना अध्यक्षपदासाठी डेमोक्रेटिक पार्टीमधून उमेदवार मिळाला असल्याचे हिलरींनी म्हटले होते. गबार्ड या रशियाच्या यंत्रणांच्या पसंतीच्या उमेदवार असल्याचे हिलरींनी सुचविले होते.
तुलसी यांनी हिलरी यांच्या याच विधानावर बुधवारी खटला दाखल केला आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत होणाऱया उमेदवाराने आपल्याला ‘रशियाची पसंत’ म्हणत बदनाम केल्याचे तुलसी यांनी म्हटले आहे. हिलरी यांनी 2016 मध्ये डेमोक्रेट पार्टीच्या वतीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढविली होती.
तुलसी यांच्या वकिलांनी मॅनहॅटन फेडरल न्यायालयात हिलरींच्या विरोधात खटला दाखल केला आहे. हिलरींनी तुलसींच्या संबंधी असत्य विधान केले आहे. वैयक्तिक शत्रुत्व किंवा पक्षातील बदलाच्या भीतीतून त्यांनी हे कृत्य केले असावे. हिलरी आणि त्यांच्या सहकाऱयांचे डेमोक्रेटिक पार्टीवर दीर्घकाळ वर्चस्व राहिल्याचे एका वकिलाने सांगितले आहे.