इचलकरंजी / प्रतिनिधी
इचलकरंजी – हुपरी मार्गावर पंचगंगा नदीनजीक रस्त्याकडेला असलेल्या उभ्या केलेल्या अवजड वाहनाला दुचाकीची धड़क बसली. यामध्ये दुचाकीवरून घराकडे जाणारे दोन महाविद्यालयीन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. शिवप्रताप आप्पासाहेब कुंडले (वय 18), शुभम रामदास पोवार (वय 21, दोघे रा. शिवाजीनगर, हुपरी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना येथील आयजीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्यांची प्रकृती गंभीर बनल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले. हा अपघात गुरुवारी सांयकाळी झाला आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, जखमी शिवप्रताप कुंडले व शुभम पोवार हे दोघे जण महाविद्यालयीन विद्यार्थी आहेत.
ते गुरुवारी दुपारी शैक्षणिक कामाकरीता म्हणून दुचाकीवरून इचलकरंजीला आले होते. येथील आपले काम आटोपून हे दोघे सायंकाळी दुचाकीवरून घराकडे जात होते. यावेळी इचलकरंजी – हुपरी मार्गावरी पंचगंगा नदीनजीक रस्त्याकडेला उभ्या असलेल्या अवजड वाहनास दुचाकीने जोरदार धडक दिली. यामध्ये ते दोघे गंभीर जखमी झाले. रस्त्यावरून जाणार्या नागरिक त्वरीत मदतीला धावून येवून, दोघाना उपचारासाठी येथील आयजीएम रूग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी सीपीआर रूग्णालयात हलविले. याबाबतची नोंद रात्री उशिरापर्यंत पोलिसात झाली नव्हती.