सीसीबी पोलिसांची कारवाई : रक्कम जप्त
वार्ताहर/ हुबळी
लोकायुक्त छाप्यात आमदार माडाळ वीरुपाक्षप्पा यांच्या मुलाजवळ 8 कोटी रुपये आढळून आले आहेत. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा सुरू असतानाच हुबळीतील एका उद्योजकाच्या निवासस्थानावर केंद्रीय गुन्हे शाखेच्या (सीसीबी) पोलिसांनी छापा टाकला आहे. उद्योजकाच्या निवासस्थानी 3 कोटींचे घबाड सापडले असून सदर रक्कम जप्त करण्यात आली आहे.
हुबळीतील भवानीनगर येथील साई गार्डनमध्ये असलेल्या रमेश बोनगेरी यांच्या निवासस्थानावर हुबळी-धारवाड सीसीबीचे एसीपी नारायण बरमनी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. यावेळी रमेश यांच्या निवासस्थानी 500 च्या नोटा असणारे एकूण 3 कोटी रुपये आढळून आले. या रकमेसंबंधी कोणतीही कागदपत्रे रमेश यांनी तपास अधिकाऱ्यांकडे सादर केली नाही. त्यामुळे ही रक्कम जप्त करण्यात आली आहे.
या प्रकरणी हुबळीच्या अशोकनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक एस. के. पट्टणकुडे यांनी पुढील तपास सुरू केला आहे. 3 कोटी रक्कम कोठून आली?, इतकी रक्कम जमा करून ठेवण्यामागील कारण कोणते?, याचा तपास केला जात आहे. शिवाय अधिक तपासासाठी प्राप्तिकर विभागालाही याविषयी माहिती देण्यात आली आहे.
सदर कारवाईची दखल घेत हुबळी-धारवाड पोलीस आयुक्त रमण गुप्ता यांनी सीसीबीचे एसीपी नारायण बरमनी, आर्थिक गुन्हे विभागाचे विशेष तपास पथकाचे एएसआय बी. एन. लंगोटी, बसवराज बेळगावी, एफ. बी. कुरी, राजीव बिष्टंडेर, संतोष इच्चंगी आणि पी. सी. विद्या यांचे अभिनंदन केले आहे. तसेच या पथकाला 25 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.