वार्ताहर /धारगळ
धारगळ सुके कुळण जंक्शन ते मोपा विमानतळापर्यंतच्या अंदाजे पाच ते सहा किलोमीटर रस्त्याचे हॉटमिक्सिंगचे काम शनिवार रोजी सुरू केले तर आश्चर्य म्हणजे दुसऱया दिवशीच रविवारी हनाटी दाडाचीवाडी येथे त्याच रस्त्याचे खोदकाम केले.
आतापर्यंत या रस्त्याच्या दुतर्फा अनेकवेळा विविध कामासाठी खोदकाम केले आहे. त्यानंतर हॉटमिक्सिंग सुरू झाले होते. आता यापुढे सदर रस्त्याचे खोदकाम होणार नाही असे ग्रामस्थांना वाटत होते. मात्र रस्ता हॉटमिक्सिंग केला आणि दुसऱया दिवशीच पुन्हा रस्ता खणून रस्ता विद्रुप केला. या भागातील जनता, ग्रामस्थ, वाहन चालक अगोदरच या रस्त्याच्या कामामुळे त्रस्त झाले आहेत. यापूर्वी रस्त्याचे खोदकाम करताना अनेक लहान मोठे अपघातही झालेले आहेत. आता आपण या अपघातातून एकदा सुटलो अशी भावना वाहन चालकाची झाली होती. मात्र रस्ता पुन्हा खणल्यामुळे ग्रामस्थ व वाहन चालकांनी नाराजी व्यक्त करून तरी या रस्त्याचे खोदकाम थांबवावे अशी विनंती त्यांनी केली आहे.