शिक्षण मंत्र्यांसमोर शिक्षकांनी मांडली कैफियत
प्रतिनिधी /बेळगाव
राज्यात 1995 नंतरच्या शाळांना अनुदान दिले जात नसल्याने शिक्षकांची आर्थिक परिस्थिती खालावत आहे. शाळांमध्ये पगार कमी असल्यामुळे हॉटेलमध्ये काम करावे लागत आहे. अशीच परिस्थिती अनेक शिक्षकांची असल्यामुळे शाळांना अनुदान देण्याची मागणी शिक्षकांनी शिक्षणमंत्र्यांकडे केली.
शिक्षणमंत्री बी. सी. नागेश गुरूवारी हुबळी व बेळगाव दौऱयावर आले होते. बेळगावमध्ये आल्यावर त्यांची 1995 नंतरच्या शाळा शिक्षकांनी भेट घेतली. शाळांना अनुदान नसल्याने मागील 10 ते 15 वर्षांपासून शिक्षक विनापगार काम करत आहेत. काही ठिकाणी तुटपुंजा पगार दिला जात असल्याने कुटुंब चालवायचे कसे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे लवकर अनुदान देण्याची मागणी करण्यात आली.
डी.एड.- बी.एड. कशासाठी केला?
भेटीदरम्यान एक शिक्षक भाऊक होवून आपली आर्थिक परिस्थिती सांगू लागला. यामुळे शिक्षणमंत्री भलतेच संतापले. तुम्ही डी.एड- बी. एड करा म्हणून सरकार काही तुमच्याकडे आले नव्हते. त्यामुळे आम्ही नोकरीची हमी कशी देणार ? सध्या नविन शाळांना अनुदान देणे राज्याला परवडणारे नसल्याचे सांगत राग व्यक्त केला. यामुळे निवेदन देण्यासाठी गेलेल्या शिक्षकांनी नाराजी व्यक्त केली.