वृत्तसंस्था/ सेंट जोन्स
विंडीजचा क्रिकेट संघ मेच्या अखेरीस हॉलंड आणि त्यानंतर जून महिन्यात पाकच्या दौऱयावर जाणार आहे. या दौऱयामध्ये विंडीजचा संघ एकूण सहा वनडे सामने खेळणार आहे. सोमवारी क्रिकेट विंडीजने या दौऱयासाठी विंडीज संघाची घोषणा केली असून माजी कर्णधार जेसॉन होल्डरला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे.
विंडीजचा संघ हॉलंडबरोबर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. उभय संघातील हे वनडे सामने 31 मे, 2 जून आणि 4 जूनला होणार आहेत. या वनडे मालिकेनंतर विंडीजचा संघ पाकच्या दौऱयावर तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. उभय संघातील वनडे सामने 8 जून, 10 जून आणि 12 जून रोजी होणार आहेत. विंडीजचा संघ हॉलंडच्या दौऱयात पहिल्यांदाच वनडे मालिका खेळत आहे. या मालिकेतील सामने ऍमस्टलव्हीनमधील व्हीआरए क्रिकेट मैदानावर खेळविले जातील तर पाक आणि विंडीज यांच्यातील वनडे सामने रावळपिंडीच्या स्टेडियममध्ये होणार आहेत. विंडीज संघाच्या या दोन्ही वनडे मालिका आयसीसीच्या वनडे सुपर लीग अंतर्गत राहतील. आयसीसीची 2023 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा भारतात होणार आहे. सुपर लीग स्पर्धेत सहभागी होणाऱया संघांना अधिक गुण मिळवून आगामी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सात स्थानापैकी एका स्थानावर संधी मिळणार आहे. हॉलंड आणि पाक दौऱयासाठी विंडीज संघाचे नेतृत्व निकोलस पूरनकडे सोपविण्यात आले आहे.
विंडीज संघ- निकोलस पूरन (कर्णधार), शाय होप (उपकर्णधार), बॉनेर, ब्रुक्स, कार्टी, अकील हुसेन, ए. जोसेफ, ब्रेन्डॉन किंग, एस.लेवीस, मेयर्स, फिलीप, आर.पॉवेल, सिलेस, शेफर्ड आणि हेडन वॉल्श (ज्युनियर)
विंडीज- हॉलंड पहिला वनडे सामना 31 मे,. दुसरा वनडे सामना 2 जून, तिसरा वनडे सामना 4 जून.
विंडीज-पाक पहिला वनडे सामना 8 जून, दुसरा वनडे सामना 10 जून, तिसरा वनडे सामना 12 जून.