डॉक्टर-कर्मचारीवर्गातून तीव्र संताप : जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटल रोडवर असलेल्या खासगी हॉस्पिटलकडे रुग्णाला घेऊन चारचाकी वाहने आली असता ती रस्त्यावर का थांबविली म्हणून पोलीस त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करत आहेत. याच रस्त्यावर मोठय़ा खासगी हॉस्पिटल्सना मात्र मुभा देण्यात येत आहे. एकाला एक तर दुसऱयाला एक न्याय, असा प्रकार सुरू आहे. तेव्हा अत्यावश्यक सेवा करणाऱया रुग्णवाहिका तसेच वाहनांवर पोलिसांनी कारवाई करू नये, या मागणीसाठी बेळगाव जिल्हा बांधकाम संघटना तसेच वकील व डॉक्टर यांनी जिल्हाधिकाऱयांना निवेदन दिले.
सिव्हिल हॉस्पिटल रोडवर अनेक खासगी हॉस्पिटल आहेत. त्या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अत्यावश्यक सेवा दिली जाते. हृदयरोग किंवा इतर आजारांनी अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना दाखल करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तसेच इतर नागरिक वाहनांमधून आणत असतात. वाहनांमधून अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करताना अचानक रहदारी पोलीस त्या ठिकाणी येत आहेत. त्यानंतर कोणताही विचार न करता दंडात्मक कारवाई करत आहेत. ही बाब अत्यंत गंभीर आहे.
अत्यवस्थ झालेल्या रुग्णांना वाहनांमधून आणले जाते. याचबरोबर डॉक्टर तसेच कर्मचारीही त्यांच्यावर उपचार करण्यासाठी घाईगडबडीत वाहने तेथेच पार्क करून हॉस्पिटलमध्ये जात असतात. मात्र त्या वाहनांना दंडात्मक कारवाई केली जात आहे. यामुळे रुग्णांचे नातेवाईक, डॉक्टर आणि कर्मचारी या त्रासाला कंटाळले आहेत.
याच रस्त्यावर अनेक मोठी हॉस्पिटल्स आहेत. त्या ठिकाणी दोन्ही बाजूला पार्किंग केले जाते. मात्र पोलीस त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाहीत, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. ही कारवाई तातडीने थांबवावी, अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी आर. व्यंकटेशकुमार यांनी निवेदन स्वीकारले. तातडीने याबाबत सूचना करू, असे आश्वासन दिले.
यावेळी बांधकाम संघटनेचे जिल्हा अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर, ऍड. अण्णासाहेब घोरपडे, ऍड. मारुती कामाण्णाचे, ऍड. महादेव शहापूरकर, ऍड. के. के. यादगुडे, डॉ. एफ. ए. फैजान, डॉ. श्रद्धा पाटील, डॉ. सुनीता बेळगल, अशोक गेंवकर, राहुल पाटील, ऍड. यशवंत लमाणी यांच्यासह डॉक्टर व कर्मचारी उपस्थित होते.