होतकरू क्रिकेटपटूंना बेळगावात संधी उपलब्ध करून देणार
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावात अनेक होतकरू क्रिकेटपटू आहेत. या क्रिकेटपटूंना तंत्रशुद्ध फलंदाजी आणि गोलंदाजीच्या मार्गदर्शनासाठी बाहेरचे उच्च प्रशिक्षक आणून बेळगावच्या क्रिकेटपटूंना संधी मिळवून देण्याचे काम मी करणार आहे. क्रीडापटूंना पुढील सर्व सोयी सवलती उपलब्ध करून देणार आहे. त्यासाठी क्रीडापटूंनी खडतर मेहनत घेऊन सराव करावा, असे प्रतिपादन एसकेई सोसायटीचे चेअरमन किरण ठाकुर यांनी केले.
जीएसएस महाविद्यालयाच्या क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कर्नाटकाचा रणजी क्रिकेटपटू रोहन कदम, स्नेहा कदम, प्रा. बी.एल. मजुकर, प्रा. अरविंद हलगेकर, क्रीडा प्राध्यापक प्रशांत मणकाळे, विद्यार्थी प्रतिनिधी रोहन शेलार, वैशाली पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. प्रारंभी वैष्णवी जोशीच्या स्वागतगीताने कार्यक्रमाची सुरूवात झाल्यावर प्राचार्य बी .एल. मजुकर यांनी स्वागत केले. अरविंद हलगेकर यांनी परिचय करून दिला.
पाहुण्यांच्या हस्ते रोपटय़ाला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी रणजीपटू रोहन कदम म्हणाला, आपण टप्याटप्याने सराव करीत आपले ध्येय गाठले पाहिजे तरच आपण स्वप्न पूर्ण करू शकतो. कठोर मेहनत, नियमित सरावानी आपल्यातील आत्मविश्वास वाढतो. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात ठसा उमटू शकतो. बेळगावात होतकरू क्रिकेटपटू आहेत. पण, त्यांना वाव मिळत नाही. आता बेंगळूरसारख्या सर्व सोयी व उच्च प्रशिक्षण उपलब्ध होणार असल्याने क्रिकेटपटूंनी याचा फायदा घेतला पाहिजे. तरच आपण पुढे जाऊ शकतो. आपल्या ज्येष्ठ क्रिकेटपटू व प्रशिक्षकांचा सल्ला लक्षात घेवून आपण काम केले पाहिजे. आई-वडील गुरूजनांचा आदर ठेवला पाहिजे. तरच आपण जीवनात यशस्वी होवू शकतो, असे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. पाहुण्यांच्या हस्ते क्रीडा-सांस्पृतिक प्रकाराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.