होळी कामाण्णा मंदिरांना रंगरंगोटी
प्रतिनिधी /बेळगाव
रंगांचा सण म्हणून ओळख असलेल्या होळी व रंगपंचमीला गुरुवारपासून प्रारंभ होणार आहे. होळी सणाला धार्मिक महत्त्व असल्यामुळे शहरात होळी कामाण्णा मंदिरांना रंगरंगोटी करण्यात आली. रंगांची उधळण करण्यासाठी बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात रंगांची आवक झाली आहे. दोन वर्षे कोरोनामुळे रंगपंचमीचा आनंद घेता आला नव्हता. परंतु यावषी मोठय़ाप्रमाणात रंगपंचमी साजरी करण्यासाठी तयारी केली जात आहे.
गुरुवारी रात्री होळीदहन केले जाते. होळीला पुरणपोळीचा नैवैद्य दाखविला जातो. यासाठी आठवडाभरापासूनच महिलांकडून खरेदी केली जात आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती. रंगपंचमीनिमित्त आकर्षक पिचकाऱया, रंग, मुखवटे व हर्बल स्प्रे खरेदीसाठी बालचमुंसह युवकांची स्टॉलवर झुंबड होती. काही शाळा व महाविद्यालयांमध्ये बुधवारपासूनच रंग उधळण्यास सुरुवात केली होती.
होळी सणासाठी बाजारपेठेत दुकानदारांनी सर्व साहित्य उपलब्ध केले होते. होळीनंतर दुसऱया दिवशी बेळगाव शहर व परिसरात रंगपंचमी साजरी केली जाते. यामुळे ठिकठिकाणी रंग आणि पिचकाऱयांचे स्टॉल्स मांडण्यात आले होते. यावर्षी विविध प्रकारच्या पिचकाऱया उपलब्ध करण्यात आल्या होत्या. शहरातील किर्लोस्कर रोड, गणपत गल्ली, मारुती गल्ली, पांगुळ गल्ली, कडोलकर गल्ली आदी भागांत साहित्यांनी दुकाने फुलली होती. शुक्रवारी बेळगाव शहरासह अनगोळ परिसरात रंगोत्सव साजरा होणार आहे. वडगाव, शहापूर व ग्रामीण भागात मंगळवारी रंगोत्सव होणार आहे.
अश्वत्थामा मंदिरात लोटांगण
दक्षिण भारतातील एकमेव असणारे अश्वत्थामा मंदिर पांगुळ गल्ली येथे आहे. प्रतिवषी रंगपंचमीदिवशी या मंदिरासमोर लोटांगण घालण्याचा कार्यक्रम होतो. मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी हे लोटांगण घातले जाते, अशी आख्यायिका आहे. केवळ बेळगावच नव्हे तर आसपासच्या भागातून शेकडो भाविक लोटांगण घालण्यासाठी येथे येतात. शुक्रवारी सकाळी लोटांगण होणार असून यासाठी आतापासूनच मंदिर प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.