प्रतिनिधी/ कराड
जिह्यात कोरोना रुग्णवाढीचा आकडा दररोज नवा भीतीदायक आलेख तयार करत असतानाही शेकडो हौशे-गवशे लॉकडाऊनच्या नियमांची पायमल्ली करत आहेत. अशा विनाकारण खोटे कारण सांगून मोकाट फिरणारांवर पोलिसांनी शुक्रवारी दुपारनंतर कडक कारवाईचा बडगा उगारला. सायंकाळी सात वाजेपर्यंत संचारबंदीचे उल्लंघन करणाऱया 59 जणांच्या दुचाकी तात्पुरत्या जप्त केल्या. तर रस्त्यावर, कट्टय़ावर गप्पा हाणत बसलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली.
जिह्यात कोरोनाचा दर मिनिटाला एक रुग्ण वाढत आहे, अशी परिस्थिती सध्याची आहे. या परिस्थितीला आटोक्यात ठेवण्यासाठी कराड, मलकापूरकरांनी लॉकडाऊनचे कडक पालन करावे, असे आवाहन प्रशासन करत आहे. मात्र सर्रास खोटे कारण सांगून अनेक नागरिक, हुल्लडबाज युवक शहरात दुचाकीवरून फिरत आहेत. लॉकडाऊनच्या दुसऱया दिवशी पोलिसांनी कारवाईची मोहीम कडक करत अशा हौश्या-गवश्यांवर कारवाई करायला सुरुवात केली. पोलीस उपअधीक्षक रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाला विजय गोडसे, वाहतूक शाखेच्या सरोजनी पाटील यांनी कोल्हापूर नाका, ढेबेवाडी फाटा, सैदापूर कॅनॉल, वारूंजी फाटा या कराडात येणाऱया रस्त्यांवर वाहने अडवून चौकशी सुरू केली. पोलिसांनी कडकपणे चौकशी करताच अनेक वाहनधारकांची बोबडी वळत होती. ते खोटे कारण सांगून फिरत असल्याचे लक्षात येताच त्याच्यावर कारवाई केली जात होती.