बेंगळूर/प्रतिनिधी
राज्यात कोरोनाची दुसरी लाट भीतीदायक बनल्यानंतर, जेव्हा कोरोनाचे आणि मृत्यूचे प्रमाण वाढू लागले, तेव्हा ऑक्सिजनची कमतरता भासू लागली त्यावेळी भारतीय रेल्वेने राज्य सरकारच्या समन्वयाने ऑक्सिजन एक्सप्रेस चालविली. दरम्यान आज कर्नाटकात आणखी एक ऑक्सिजन एक्सप्रेस दाखल झाली. याविषयी नैऋत्य रेल्वेच्या बेंगळूर रेल्वे विभागाने माहिती दिली आहे.
नैऋत्य रेल्वेने मंगळवारी सांगितले की, २९ वी ऑक्सिजन एक्सप्रेस आज बेंगळूर येथे दाखल झाली. दरम्यान ओडिशाच्या राउरकेला येथून १२६.७८ टन लिक्विड मेडिकल ऑक्सिजन (एलएमओ) घेऊन निघाली होती. या ट्रेनने ६ क्रायोजेनिक कंटेनर होते. या कंटेनरमध्ये १२६.७८ टन ऑक्सिजन होता, असे एसडब्ल्यूआरने एका निवेदनात म्हटले आहे. एसडब्ल्यूआरच्या माहितीनुसार, कर्नाटकला रेल्वेने ३,३४०.७७ टन एलएमओ ऑक्सिजन मिळाला आहे. (पीटीआय)