ऑनलाईन टीम / पुणे :
म्युकरमायकोसिस आजारावरील ‘ॲम्फोटेरिसिन-बी’ या औषधाचा काळाबाजार करणाऱ्या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून 22 ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन जप्त करण्यात आली आहेत.
या प्रकरणात काही दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने काही आरोपींना अटक केली होती. त्यावेळी त्यांच्याकडून 4 ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन जप्त करण्यात आली होती. अधिक तपासाअंती या प्रकरणात शरण बसवेश्वर, सिद्धेश्वर ढमामे हे सामील असल्याचे समोर आले. त्यामुळे या दोघांना सोलापूरमधून अटक करण्यात आली आहे. तसेच या इंजेक्शनचा पुरवठा गुलबर्गामधून होत असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी गुलबर्गामधून राजशेखर कासाप्पा भजंत्री याला अटक करुन त्याच्याकडून 22 ॲम्फोटेरिसिन-बी इंजेक्शन जप्त केली. बाजारात 6 हजार रुपये किंमत असणारे हे इंजेक्शन काळ्या बाजारात 20 ते 30 हजार रुपये किंमतीने विकले जात होते.