अन्य बचत योजनांवरील व्याजदर जैसे थे : अल्पबचत ठेवींवरील नवे व्याजदर जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
केंद्रीय अर्थ मंत्रालयाने चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर या तिसऱ्या तिमाहीसाठी छोट्या बचत योजनांचे व्याजदर जाहीर केले आहेत. या तिमाहीसाठी केवळ पोस्ट ऑफिसच्या 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींच्या (आरडी) व्याजदरात 0.20 टक्क्यांची व्याजदरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. नवे व्याजदर जाहीर करताना पीपीएफ, सुकन्या समृद्धी योजनेसह किसान विकास पत्राच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. तसेच पुन्हा एकदा सार्वजनिक भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरातही कोणतीही वाढ झालेली नाही. या पीपीएफ योजनेत 7.1 टक्के व्याज मिळणार आहे.
अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागाने ऑक्टोबर ते डिसेंबर या तिमाहीचे व्याजदर जाहीर केले आहेत. 5 वर्षांच्या आवर्ती ठेवींवरील व्याजदर 6.5 टक्क्मयांवरून 6.7 टक्के झाल्याने 20 बेसिस पॉईंट्सने वाढ करण्यात आली आहे. मात्र, वेगवेगळ्या कालावधीच्या पोस्ट ऑफिस ठेव योजनांच्या व्याजदरात कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
1 ऑक्टोबर 2023 ते 31 डिसेंबर 2023 पर्यंत सुकन्या समृद्धी योजनेवर 8 टक्के व्याज मिळेल. राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रावरील व्याजदर 7.7 टक्के कायम ठेवण्यात आला आहे. किसान विकास पत्रामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 7.5 टक्के व्याज मिळणार असून त्याची मॅच्युरिटी मर्यादा 115 महिने इतकी आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर या तिमाहीत 8.2 टक्के व्याज मिळेल. पोस्ट ऑफिस मंथली इनकम अकाउंट स्कीममधील गुंतवणुकीवर 7.4 टक्के व्याज मिळेल. एक वर्षाच्या मुदतीच्या ठेवींवर 6.9 टक्के, 2 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 7 टक्के, 3 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 7 टक्के आणि 5 वर्षांच्या मुदतीच्या ठेवींवर 7.5 टक्के व्याज मिळेल.
पीपीएफ गुंतवणूकदारांमध्ये निराशा
एप्रिल 2020 पासून पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल झालेला नाही. सध्या या योजनेत 7.1 टक्के व्याज मिळणार आहे. सरकारने सर्व बचत योजनांचे व्याजदर वाढवले असले तरी पीपीएफमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांची निराशा झाली आहे.