केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती : फास्टॅग नसताना सदर लेनमध्ये एन्ट्री केल्यास अतिरिक्त टोलचा फटका
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
नववर्षापासून देशातील सर्व वाहनांसाठी फास्टॅग अनिवार्य करण्यात आल्याचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी गुरुवारी जाहीर केले. 1 जानेवारी 2021 पासून वाहनांवर फास्टॅग नसल्यास वाहनधारकाला त्याची मोठी किंमत मोजावी लागू शकते. फास्टॅगशिवाय वाहन टोल प्लाझावरील फास्टॅग लेनमधून गेल्यास दुप्पट टोल भरावा लागेल. एका कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित करताना गडकरी यांनी ही माहिती दिली.
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्यासाठी नववर्षापासून प्रत्येक वाहनांवर फास्टॅग बसवणे अनिवार्य केले आहे. फास्टॅगची सक्ती केल्यामुळे वाहनांना टोलनाक्मयांवर रोख रकमेने टोल भरावा लागणार नाही. यामुळे वाहनाचे इंधन आणि प्रवाशांच्या वेळेची बचत होईल, असे गडकरी यांनी स्पष्ट केले आहे.
टोलनाक्मयांवरील वाहनांच्या रांगांवर मात करण्यासाठी गेल्या काही वर्षांपासून वाहनांसाठी फास्टॅग लावणे आणि बंधनकारक करणे याबाबतच्या हालचाली केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाकडून सुरू होत्या. परंतु, फास्टॅगची संख्या आणि वाहनधारकांची संख्या पाहता दिलेल्या वेळेत सर्व वाहनांना स्टिकर्स उपलब्ध करून देणे शक्मय न झाल्यामुळे वाहनधारकांना मुदत देण्यात आली होती. परंतु आता नव्या वर्षापासून प्रत्येक वाहनाला फास्टॅगचा स्टिकर लावणे बंधनकारक असणार आहे.
नोव्हेंबर 2020 मध्ये रस्तेवाहतूक मंत्रालयाकडून 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅग बंधनकारक करण्याचे निर्देश प्रसिद्ध करण्यात आले.
1 डिसेंबर 2017 च्या आधी विक्री झालेल्या वाहनांसाठीही फास्टॅग बंधनकारक असणार असल्याचे यात नमूद करण्यात आले होते. तत्पूर्वी फास्टॅग ही संकल्पना 2016 पासून सुरू करण्यात आली होती. सुरुवातीला चार अधिकृत बँकांनी सुमारे लाखभर वाहनधारकांना फास्टॅग वितरित केले. 2017 मध्ये हाच आकडा वाढून सात लाखांपर्यंत गेला. त्यानंतर 2018 च्या अंती हा आकडा 34 लाखांवर जाऊन पोहोचला होता.
फास्टॅगचा वापर…
टोलनाक्यावरून वाहन रवाना झाल्यानंतर फास्टॅग अकाऊंटमधून टोलचे पैसे वजा होतील. संबंधित वाहन धारकाला त्यासंबंधीचा एक एसएमएस मोबाईलवर प्राप्त होईल. अकाऊंटमधील पैसे संपल्यानंतर ते पुन्हा रिचार्ज करावे लागणार आहे.
फास्टॅगची वॅलिडिटी पाच वर्षांची असेल. पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर नव्याने फास्टॅग खरेदी करावे लागणार आहे.
फास्टॅगचे फायदे
- वेळेची बचत
- इंधनाची बचत
- एसएमएस अलर्ट
- गर्दीपासून सुटका
- कॅशलेस सुविधा
- 2.5 टक्के कॅशबॅक