भारतीय चलनातील मूल्य पाहता अर्धा लिटर पेट्रोल मिळणे दुरापास्त
वृत्तसंस्था/ कराकस
दक्षिण अमेरिकेतील व्हेनेझुएला या देशाने आर्थिक तंगी आणि भयंकर महागाईला तोंड देण्यासाठी 10 लाख बोलिवरची नवी नोट चलनात आणली आहे. यापूर्वी जगातील कुठल्याच देशाने एवढी मोठी चलनी नोट छापली नव्हती. व्हेनेझुएलाच्या वर्तमान महागाईनुसार 10 लाख बोलिवरचे मूल्य अर्ध्या अमेरिकन डॉलर्सचे (सुमारे 36 रुपये) आहे. इतक्या रकमेत भारतात अर्धा लिटर पेट्रोलही मिळणार नाही. एकेकाळी कच्च्या तेलाच्या जोरावर समृद्धी पाहणाऱया व्हेनेझुएलात लोकांची आता उपासमार सुरू आहे. चलनातील अवमूल्यनामुळे लोक बँग आणि पोत्यांमध्ये भरून नोटा नेतात आणि हातात प्लास्टिकच्या पिशव्यांमधून घरोपयोगी साहित्य खरेदी करून आणतात.
देशाची अर्थव्यवस्था पाहता एवढी मोठी नोट चलनात आणावी लागली आहे. पुढील आठवडय़ात दोन लाख बोलिवर आणि 5 लाख बोलिवरची नोटही सादर करण्यात येईल अशी माहिती तेथील मध्यवर्ती बँकेने दिली आहे. सद्यकाळात व्हेनेझुएलात 10 हजार, 20 हजार आणि 50 हजार बोलिवरच्या नोटा प्रचलनात आहेत. व्हेनेझुएलात भारताच्या 1 रुपयाचे मूल्य 25584.66 बोलिवर आहे.
10 लाखांच्या नोटात अर्धा किलो तांदूळ
व्हेनेझुएलात 10 लाख बोलिवरची नोट आता सर्वात मोठे मूल्य असलेले चलन टरले आहे. पण या रकमेत तेथे केवळ दोन किलो बटाटे किंवा अर्धा किलो तांदूळच खरेदी करता येणार आहेत. तेथील सरकार लोकांना दिलासा देण्यासाठी अधिक मूल्य असलेल्या नोटा छापण्याची योजना आखत आहे. यामुळे सर्वसामान्यांना मोठय़ा संख्येत रक्कम नेण्याच्या त्रासापासून काहीअंशी दिलासा मिळणार आहे.
सलग आठव्या वर्षी मंदीच्या विळख्या
कोरोना महामारी आणि कच्च्या तेलातून मिळणारी रक्कम संपुष्टात आल्याने व्हेनेझुएलाची अर्थव्यवस्था सलग 8 व्या वर्षी मंदीत सापडली आहे. चालू वर्षाच्या अखेरपर्यंत देशाची अर्थव्यवस्था 20 टक्क्यांनी आंकुचन पावणार असल्याच शंका आहे. भ्रष्टाचारामुळै या देशाची अर्थव्यवस्था अधिकच बिकट होत चालली आहे. व्हेनेझुएलातील भ्रष्टाचारामळे तेथे पायी चालण्यासाठीही लाच द्यावी लागू शकते.
देश सोडत आहेत लोक
2013 नंतर सुमारे 30 लाख लोकांनी स्वतःचा देश सोडून शेजारच्या ब्राझील, कंबोडिया, इक्वेडोर आणि पेरूमध्ये आश्रय घेतला आहे. पण स्थिती अत्यंत खराब झाल्याने या देशांनीही व्हेनेझुएलाच्या सीमेवर स्वतःचे सैन्य तैनात केले आहे. सद्यकाळात हे जगातील कुठल्याही देशात झालेले सर्वात मोठे विस्थापन आहे.
स्थिती अशी का?
व्हेनेझुएला एकेकाळी दक्षिण अमेरिकेतील सर्वात श्रीमंत देश होता. या देशाकडे सौदी अरेबियापेक्षाही अधिक कच्च्या तेलाचे साठे आहेत. सोने आणि हिऱयाच्या खाणीही आहेत. सरकारला 95 टक्के उत्पन्न कच्च्या तेलापासूनच प्राप्त होते. 1998 मध्ये अध्यक्ष ह्यूगो शावेज यांनी दीर्घकाळापर्यंत सत्तेवर राहण्यासाठी देशाच्या व्यवस्थेत अनेक बदल केले. सरकारी आणि राजकीय बदलांसह शावेज यांनी उद्योगांचे राष्ट्रीयकरण केले. खासगी क्षेत्राच्या विरोधात पावले उचलली. पैसा कमी पडू लागल्यावर भरमसाठ कर्जाची उचल केली आणि देश हळूहळू कर्जाच्या दलदलीत अडकत केला. तेल कंपन्यांकडून पैसे घेत गरजू वर्गावर खर्च केल्याने शावेज दयावान ठरले, पण व्हेनेझुएलाच्या अर्थव्यवस्थेला वाळवी लागली.
व्हेनेझुएलासमोर मोठे संकट
चलनाचे मूल्य खालावणे, वीजकपात आणि मूलभूत गरजांच्या गोष्टी महाग होणे या तेथील सर्वात मोठय़ा समस्या आहेत. व्हेनेझुएलात जलविद्युत ऊर्जेचा सर्वात मोठा वापर होतो. 2015 मध्ये दुष्काळ पडल्याने तेथील वीजनिर्मितीचे प्रमाण प्रचंड खालावले आहे. एप्रिल 2016 मध्ये सरकारने शासकीय कार्यालये केवळ सोमवारी आणि मंगळवारी सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला होता. व्हेनेझुएलात महागाईचा दर 2600 टक्क्यांपेक्षाही अधिक राहिला आहे.