डोनेगल / वृत्तसंस्था
आयर्लंडमध्ये पेट्रोल केंद्रामध्ये झालेल्या एका भीषण स्फोटाच्या घटनेत 10 जणांना प्राण गमवावे लागले. स्फोटाची माहिती मिळताच पोलिसांनी बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू झाल्याच्या वृत्ताला पोलिसांनीही दुजोरा दिला आहे. मृतांमध्ये 3 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. पेट्रोल केंद्रातील या स्फोटाचे कारण अद्याप समजलेले नाही. आयरिश पंतप्रधान मायकल मार्टिन यांनी या घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे.
नॉर्थ-वेस्ट आयर्लंडमधील डोनेगल कौंटीमधील पेसलो या छोटय़ाशा गावात ऍपलग्रीन पेट्रोल स्टेशनवर शनिवारी मध्यरात्री हा स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की आजूबाजूच्या काही इमारतींनाही त्याची झळ बसली. तसेच घटनास्थळी उभ्या असलेल्या गाडय़ाही बेचिराख झाल्या. स्फोटानंतर पेट्रोल स्टेशन आणि आसपासच्या इमारती उद्ध्वस्त झाल्या. काही लोक ढिगाऱयाखाली गाडले गेले. बचावकार्यासाठी आपत्कालीन सेवा दलांना पाचारण करण्यात आले. या अपघातात 8 जण गंभीर जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यापैकी एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.