ऑनलाईन टीम / मुंबई :
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या शिवभोजन थाळीचा प्रारंभ प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून रविवारी करण्यात आला. पण या थाळीचा शुभारंभानिमित्तच्या एका फोटोमुळे राज्यातील गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे नेते अमेय खोपकर यांनी टीका केली.
जितेंद्र आव्हाड यांचा एक फोटो आपल्या ट्विटर हँडलवरून शेअर करत त्यासोबत त्यांनी म्हटले आहे की, 10 रुपयाच्या थाळीसोबत 20 रुपयांची बिसलेरी पिणारा गरीब माणूस!
जितेंद्र आव्हाड यांच्या फोटोमध्ये ते शिवभोजन थाळीतील पदार्थ खाताना दिसतात. पण त्यांच्या ताटाशेजारी एक पाण्याची बाटली दिसते. याच पाण्याच्या बाटलीवरून अमेय खोपकर यांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका केली. वास्तविक शिवभोजन थाळी ही गरिबांसाठी सुरू करण्यात आली आहे. गरिबांना स्वस्तात चांगले जेवण घेता यावे, असा या थाळीचा उद्देश आहे.