वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इस्कॉनच्या गोशाळेतील गायी कसाईंना विकल्याचा गंभीर आरोप भाजप खासदार मनेका गांधी यांनी केल्यानंतर आता याप्रकरणी संघटनेकडून रितसर कारवाई करण्यात आली आहे. इस्कॉनने मनेका गांधी यांना 100 कोटी ऊपयांची मानहानीची नोटीस पाठवली आहे. त्यांनी केलेल्या अपमानास्पद, निंदनीय आणि दुर्भावनापूर्ण आरोपांमुळे आमचे जगभरातील भक्त, समर्थक आणि हितचिंतक अतिशय दु:खी आहेत. इस्कॉनविऊद्धच्या भ्रामक प्रचाराविऊद्ध न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही, असे इस्कॉनच्या वतीने सांगण्यात आले.
माजी केंद्रीय मंत्री आणि प्राणी हक्क कार्यकर्त्या मनेका गांधी यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. त्यामध्ये इस्कॉनने सुरू केलेल्या गोशाळांच्या माध्यमातून फसवणूक सुरू असल्याचा दावा करण्यात आला होता. इस्कॉन सरकारी मदतीच्या आधारे गोशाळा सांभाळत असून तेथील दूध देत नसलेल्या गायींना कसायाच्या ताब्यात दिले जाते, असेही म्हणण्यात आले होते. यावेळी त्यांनी आंध्रप्रदेशातील अनंतपूर येथील इस्कॉनचे उदाहरणही दिले. येथील गोशाळेला भेट दिल्यानंतर दूध देत नसलेली एकही गाय निदर्शनास आली नाही. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की ते (इस्कॉन) दूध न देणाऱ्या गायी आणि वासरे विकतात, असा दावा मनेका गांधींनी केला होता. त्यांच्या या दाव्यावरून इस्कॉनने मनेका गांधी यांना 100 कोटींच्या मानहानीची नोटीस पाठवली आहे.