वृत्तसंस्था / नवी दिल्ली
प्रसिद्ध इंजिनिअरिंग आणि बांधकाम कंपनी असणाऱ्या लार्सन अँड टुब्रोला 7 हजार कोटी रुपयांचे नवे कंत्राट मिळाले आहे. मुंबईत भुयारीं मार्ग निर्माण करण्यासाठी हे कंत्राट देण्यात आले असून ते मुंबई महानगर विभाग विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दिले आहे. ऑरेंज गेट ते ईस्टर्न फ्री वे ते मरीन ड्राईव्ह कोस्टर रोड असा हा भुयारी मार्ग निर्माण होणार आहे. हा महाप्रकल्प येत्या 54 महिन्यांमध्ये पूर्ण करायचा आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
हा दुहेरी भुयारी मार्ग असेल. याचे डिझाईन आणि बांधकाम या कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. भुयारी खोदकाम करणाऱ्या महायंत्रांच्या साहाय्याने हे बांधकाम करण्यात येणार आहे. हा भुयारी मार्ग ऑरेंज गेट किंवा ईस्टर्न फ्री वे येथील उघड्या मार्गाला येऊन मिळणार आहे. तसेच तो दुसऱ्या बाजूला मरिन ड्राईव्हलाही येऊन मिळणार आहे. यामुळे मुंबईच्या लोकल रेल्वेवरील प्रवाशांचा भार मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकेल. तसेच हा भुयारी मार्ग असल्याने भूपृष्ठावरील घरे, इमारती किंवा वाहतुकीला त्याचा कोणताही त्रास होणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले. लार्सन अँड टुब्रो ही 23 अब्ज डॉलर्सची (साधारणत: 1 लाख 85 हजार कोटी रुपये) उलाढाल असणारी बहुराष्ट्रीय कंपनी आहे.