पाकिस्तानात 2 लाखांहून अधिक कोरोनाचे रुग्ण : कोलंबियातही संकट वाढले : जगात एकूण 5,01,868 बळी
जगातील कोरोनाबाधितांची संख्या आता 1 कोटीपेक्षाही अधिक झाली आहे. यातील 54 लाख 81 हजार 056 बाधितांना कोरोना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. तर 5 लाख 01 हजार 868 बाधितांचा संसर्गामुळे मृत्यू ओढवला आहे. पाकिस्तानात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण 2 लाखांपेक्षा अधिक झाले आहे. रुग्णांच्या संख्येप्रकरणी पाकिस्तान आता 12 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. तर कोलंबियात रुग्णांचे प्रमाण चीनपेक्षाही अधिक झाले आहे. कोलंबियात 88 हजार 591 रुग्ण सापडले आहेत.
ब्रिटन : विदेश प्रवासास मंजुरी
ब्रिटन जगातील पाचव्या क्रमांकाचा कोरोनाग्रस्त देश आहे. तेथे आतापर्यंत 3,10,250 रुग्ण सापडले असून 43,514 जणांना जीव गमवावा लागला आहे. ब्रिटनच्या सरकारने 6 जुलैपासून विदेश प्रवासावरील बंदी हटविण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट निवडक युरोपीय देशांसाठी असणार आहे. यांतर्गत कमी रुग्ण असलेल्या देशांमधून आलेल्या लोकांना क्वारंटाईन व्हावे लागणार नाही. ब्रिटनमध्ये आता जनजीवन हळूहळू पूर्वपदावर आणले जात असून याकरता अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत.
रुग्णवाढीचा दर अधिक
अमेरिकेत 24 तासांमध्ये 40 हजारांपेक्षा अधिक नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचे प्रमाण 25,96,771 झाले आहे. तर अमेरिकेत आतापर्यंत 1,28,152 जण या महामारीमळे दगावले आहेत. देशातील अनेक प्रांतांमध्ये उद्योग-व्यवसाय सुरू झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. यात फ्लोरिडा, जॉर्जिया आणि ऍरिझोना सामील आहे. तर शनिवारी फ्लोरिडात सलग दुसऱया दिवशी 9 हजारांपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. फ्लोरिडा प्रांतात पुन्हा एकदा निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
द. कोरियात रुग्णवाढ
दक्षिण कोरियात 24 तासांमध्ये 62 नवे रुग्ण सापडले आहेत. बाधितांचे एकूण प्रमाण आता 12,715 झाले आहे. राजधानी सोलमध्ये 14 आणि ग्येओंग्गी प्रांतात 17 रुग्ण सापडले आहेत. दक्षिण कोरियात कोरोना संसर्गामुळे आतापर्यंत 280 जणांचा मृत्यू झाला असून 11,364 जणांना जीव गमवावा लागला आहे.
सर्व जिल्हे प्रभावित
नेपाळमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 12 हजारांवर पोहाचली आहे. सर्व 77 जिल्हय़ांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळून आले आहेत. दिवसभरात 554 नवे रुग्ण सापडले आहेत. देशात आतापर्यंत 27 जणांना जीव गमवावा लागला आहे. नेपाळमध्ये मे महिन्यापासून कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ झाली आहे.
ब्राझील : चिंताजनक
ब्राझीलमध्ये 24 तासांमध्ये 1,109 बाधितांचा मृत्यू झाला आहे. ब्राझीलमधील बळींचे प्रमाण 57,103 वर पोहोचले आहे. तर दिवसभरात 38,693 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचे एकूण प्रमाण 13 लाख 15 हजार 941 झाले आहे. तर 7 लाख 15 हजार बाधितांना महामारीपासून मुक्तता मिळाली आहे.
इस्रायल : रुग्ण वाढले
इस्रायलमध्ये 2 एप्रिलनंतर कोरोनाबाधितांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी भर पडली आहे. दिवसात 621 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील बाधितांचे प्रमाण 23,421 वर पोहोचले आहे. इस्रायलमध्ये एकूण 317 जणांचा या संसर्गामुळे मृत्यू ओढवला आहे.
चीनमध्ये दिवसात 17 नवे बाधित
चीनमध्ये दिवसभरात 17 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. तर 7 लक्षणेरहित रुग्णांचीही पुष्टी झाली आहे. मागील 24 तासांमध्ये 7 जणांना संसर्गापासून मुक्ती मिळाल्याची माहिती नॅशनल हेल्थ कमिशनने दिली आहे. तर नव्या 17 रुग्णांपैकी 14 जण स्थानिक आहेत. यातील बहुतांश जण बीजिंगचे रहिवासी आहेत. देशात आता बाधितांचा आकडा 83 हजार 500 झाला आहे. तर बळींचे प्रमाण 4,634 आहे. चीनमध्ये 78 हजार 451 बाधितांना आतापर्यंत संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे.
पाकिस्तान : 4,072 नवे रुग्ण
पाकिस्तानात मागील 24 तासांमध्ये 4,072 नवे रुग्ण सापडले असून 83 जणांना जीव गमवावा लागला आहे. देशातील बाधितांचे प्रमाण आता 2 लाख 02 हजार 955 झाले असून 4,118 जणांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्तानातील कोरोनाचा मृत्यूदर सुमारे 2 टक्के आहे. देशात आतापर्यंत 92,625 रुग्ण संसर्गातून बरे झाले आहेत. पाकिस्तानात सिंध प्रांतात सर्वाधिक संकट तेथे 78,267 रुग्ण आढळले आहेत. तर पंजाब आणि खैबर पख्तूनख्वा प्रांतात अनुक्रमे 74,202 आणि 25,380 रुग्ण सापडले आहेत.