पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयात सध्या एक अनोखे प्रकरण सादर झाले आहे. या राज्यातील इंद्री येथील एक दाम्पत्य न्यायालयात पोहोचले आहे. या दाम्पत्यातील पती 30 वर्षांचा तर पत्नी 34 वर्षांची आहे. त्यांना 11 वर्षांची एक कन्याही आहे. तथापि कनिष्ठ न्यायालयाने त्यांचा विवाहच अवैध ठरविला आहे.
या दाम्पत्यातील पतीचे म्हणणे असे की, त्याने 8 डिसेंबर 2009 या दिवशी हिंदू पद्धतीनुसार विवाह केला होता. त्यावेळी त्याचे वय 18 वर्षे 5 महिन्यांचे होते. तर त्याच्या पत्नीचे वय 22 वर्षांचे होते. विवाहानंतर दहा महिन्यांनी या दाम्पत्याला एक मुलगी झाली. 7 जुलै 2021 या दिवशी म्हणजेच विवाहानंतर 12 वर्षांनी त्यांनी विवाह नोंद करण्यासाठी अर्ज केला. तथापि त्यांचा अर्ज फेटाळण्यात आला. विवाह नोंदणी अधिकाऱयाच्या म्हणण्यानुसार विवाहाच्या वेळी नवऱयाचे वय 21 वर्षापेक्षा कमी होते. त्यामुळे विवाह नोंद करता येणार नाही. या दाम्पत्याचे म्हणणे असे की, विवाह होऊन एक कन्या रत्नही झाले आहे, अशा स्थितीत विवाह नोंद न केल्यास मुलीसमोर समस्या निर्माण होऊ शकतात. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाने सर्वसंबंधीत पक्षकारांना नोटिसा बजावल्या असून या प्रकरणाचा निर्णय काय होतो, याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे.