पर्यटन आकर्षण केंद्र उभारण्याचा संकल्प
प्रतिनिधी /म्हापसा
म्हापसा तार नदी पूर्णतः 11 किलोमीटर सौंदर्यीकरण करण्याचा सरकारचा विचार असून म्हापसा तार नदी ते हळदोणा मतदारसंघ या तार नदीच्या पात्रात दोन्ही बाजूला आगळय़ा वेगळय़ा पद्धतीने सौंदर्यीकरण करण्यात येणार असून म्हापसा वासियांसाठी दोन्ही बाजूला वॉकिंग ट्रेक घालण्यात येणार आहे. एक पर्यटन सौंदर्य केंद्र म्हणून याकडे पाहिले जाईल. याबाबत काम हाती घेण्यात आले असून याचा प्राथमिक आराखडा करण्यास सुरुवात केली आहे. परवानगी मिळविण्यासाठी हा आराखडा खात्यात सादर करण्यात आला आहे. याद्वारे शहर सौंदर्यीकरण होणार असून व पर्यटन आकर्षण केंद्र येथे होणार आहे. अशी माहिती गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी म्हापसा तार नदीच्या पुलाचे रितसर उद्घाटन केल्यावर बोलताना दिली. यावेळी व्यासपीठावर आमदार जोशुआ डिसोझा, हळदोणा आमदार कार्लुस आल्वारीस, माजी आमदार ग्लेन टिकलो सौजा, नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर, उपनगराध्यक्ष शेखर बेनकर, बस्तोडा सरपंच रणजीत उजगावकर, नगरसेवक प्रकाश भिवशेट आदी मान्यवर उपस्थित होते.
संपूर्ण म्हापसा शहर सौंदर्यीकरण करणार
पाच महिन्यापूर्वी भूमीपूजन केले होते मात्र या पुलाचे काम अवघ्या पाच महिन्यात पूर्ण केले आहे. हे सरकार काम करणारे आहे. तेरेखोल पुलही पूर्ण करणार आहेत. दिलेल्या वेळेत सातत्याने काम पूर्ण करणे हे आमचे ध्येय आहे. वेगवेगळय़ा फाईल्स पूर्ण करण्यासाठी आमदार जोशुआ सदैव तत्पर असतात. म्हापसा शहराचे पूर्णतः कसे सौंदर्यीकरण करावे याबाबत आमचा आराखडा होणार असून यासाठी खास वास्तू शिल्पकार नेमण्यात आला असून त्यांनी आपला अहवाल दिला की सर्व नगरसेवक, अधिकारी वर्ग, व्यापारी बसून यावर चर्चा होईल व म्हापसा शहराला एक वेगळे स्वरूप प्राप्त होईल अशी माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
पर्यावरणाच्या नावाखाली नाहक विरोध नको
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पुढे म्हणाले की, लोकांच्या सकार्यानेच सर्व प्रकल्प पुढे जाणार आहे. पर्यावरणाच्या नावाखाली नाहक प्रकल्पांना विरोध आणू नका असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले. पर्यावरणाची चिंता आम्हालाही आहे. त्याची काळजी आम्ही घेणार आहे. भारतात कुठेच नाही असा बायोमेडिकल कचरा प्रकल्प कुंडई येथे उभारण्यात आला आहे. साळगाव हा सहलीचा प्रकल्प तसा कुंडईचा आहे.
आयटी सेक्टरमध्ये तरुणांना रोजगार संधी
म्हापसा नदी पूर्णतः पाण्याखाली गेली आहे. येथे पूर्णतः माती व झाडे झाली आहे. नदीत कचरा, माती, प्लास्टिक आणून टाकू नका. येत्या 15 ऑगस्टला मोपा विमानतळ सुरू करणार आहोत. ह्युमन रिसोसिसकडे लक्ष देणार आहे. मोदीजींना आठ वर्षे पूर्ण होत आहेत. हे करीत असताना पंतप्रधान नवभारत निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. एका बाजूने पायाभूत सुविधा पूर्णतः देण्याकडे आमचे लक्ष आहे. नवे युवक आयटी सेक्टरमध्ये आहे त्यांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी प्रयत्नशील आहेत अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
मुख्यमंत्र्याचे सहकार्य सदैव लाभले- आमदार जोशुआ डिसोझा
ग्रीन पार्क ते तार नदीपर्यंत सौंदर्यीकरण करणार आहे. हा पूल उभारण्यास माजी आमदार ग्लेन टिकलो, कंत्राटदार, कन्सल्टन, पोलीस यांनी खूप कष्ट घेतले आहे. म्हापसा बाजारपेठेत आतमध्ये शिरण्यास हा पूल महत्त्वाचा ठरणार आहे. मुख्यमंत्र्यांचे सहकार्य आम्हाला सदैव लाभले आहे असे म्हापशाचे आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले.
सरकार अभिनंदनास पात्र- कार्लुस आल्वारीस
याबाजूने ये-जा करताना खूप त्रास व्हायचा मात्र मुख्यमंत्री, आमदार जोशुआ डिसोझा यांच्या पुढाकाराने हे काम सहज झाले आहे. यासाठी जीआयडीसीचे सहकार्य तितकेच महत्त्वाचे आहे. हे सरकार अभिनंदनास पात्र आहे असे आमदार कार्लुस आल्वारीस म्हणाले. सूत्रसंचालन नगरसेवक साईनाथ राऊळ तर आभार नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी मानले. नगरसेविका प्रिया मिशाळ यांनी स्वागत केले.
म्हापसा बाजारपेठेला पुन्हा आर्थिक राजधानी करण्यासाठी एकत्रित येऊया
म्हापसा ही एकेकाळी आर्थिक राजधानी होती ती परत एकदा गतवैभव प्राप्त करून आर्थिक राजधानी करण्यासाठी सर्वांचे सहकार्य पाहिजे. लोकांच्या सहकार्याशिवाय आर्थिक बाब होत नाही. म्हापशाची बाजारपेठ राज्यभर प्रसिद्ध होती. येथे राज्यातून बाजार करण्यासाठी सर्वजण येत होते. म्हापशातील बाजार सुप्रसिद्ध होता तशीच बाजारपेठ पुन्हा करण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित यायला पाहिजे. सर्वच गोष्टी सरकारवर सोडू नका. अतिथी देव भवं या तत्वावर आम्ही पर्यटकांना मानले पाहिजे असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.