निफ्टीतही 326 अंकांची घसरण
मुंबई
जागतिक बाजारातील समभाग विक्रीच्या कारणास्तव गुरुवारी भारतीय शेअरबाजारात मोठय़ा प्रमाणात घसरण अनुभवायला मिळाली. सेन्सेक्स सुमारे 1100 हून अधिक अंकांनी कोसळला तर निफ्टीतही 326 अंकांची घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान गेल्या 6 सत्रात भारतीय बाजारातील गुंतवणूकदारांचे 11 लाख कोटी रुपये बुडाले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या महिन्यातील ही सर्वात मोठी विक्रमी अंकांची घसरण नोंदली गेली.
गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा सेन्सेक्स 1,114.82 अंकांनी घसरुन निर्देशांक 36,553.60 वर स्थिरावला तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 326.30 अंकांनी घसरत निर्देशांक 10,805.55 वर बंद झाला. पुन्हा कोरोना पसरण्याचा अंदाज वर्तवला जात असून त्याचा परिणाम जागतिक तसेच भारतीय बाजारावर दिसून आला. कोरोनाच्या भीतीपोटी जागतिक समभागांची विक्री वाढली. युरोप, इंग्लंडमध्ये रुग्ण वाढल्याने पुन्हा कडक नियमांची अंमलबजावणी करण्याच्या बातम्यांचा परिणाम बाजारावर दिसला. गेल्या 6 सत्रात 2 हजार 700 अंकांची घसरण झाली आहे. अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबत अनिश्चितता दिसते आहे, त्याचाही परिणाम गुंतवणूकदारांवर दिसला.