पाकिस्तानी गोळीबारापासून लोकांना वाचविणार
वृत्तसंस्था/ जम्मू
जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेवर सुमारे 2 वर्षांपासून शस्त्रसंधी लागू आहे. प्रशासनाने या कालावधीचा वापर नागरिकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी केला आहे. याच्या अंतर्गत पुंछ जिल्हय़ात एलओसीनजीकच्या भागांमध्ये 13 हजारांहून अधिक शेलिंगप्रूफ बंकर्सची निर्मिती करण्यात आली आहे. या बंकर्सचा पाकिस्तानी गोळीबारादरम्यान वापर केला जाणार आहे. शस्त्रसंधीपूर्वी पाकिस्तानच्या सैन्याकडून सातत्याने होणाऱया गोळीबारामुळे या बंकर्सच्या निर्मितीचे काम हळूहळू सुरू होते. परंतु शस्त्रसंधी लागू झाल्यावर या कामाला वेग मिळाला आहे.
पुंछ हे सर्वाधिक गोळीबार प्रभावित क्षेत्रांपैकी एक आहे. एलओसीनजीकच्या भागांमध्ये 15 हजार बंकर तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. बहुतांश बंकर्सची निर्मिती पूर्ण झाली आहे. उर्वरित बंकर्स लवकरच तयार होणार आहेत. हे बंकर पाकिस्तानच्या कुठल्याही प्रकारच्या गोळीबाराचा सामना करू शकतील. बंकर्समध्ये सर्वसाधारपणे डबल आरसीसी स्लॅब असतो, जो 5 फूटांच्या वाळू अन् मातीने आच्छादलेला असतो.
एलओसीवर दोन प्रकारचे बंकर तयार केले जात आहेत, कुटुंबासाठी फॅमिली बंकर तर दुसऱया प्रकारचा बंकर हा सामुदायिक असणार आहे. तेथे गोळीबारादरम्यान अनेक कुटंबं एकत्रित आश्रय घेऊ शकतात. प्रत्येक सामुदायिक बंकरची क्षमता 40-50 लोकांना सामावून घेण्याची आहे. फॅमिली बंकरमध्ये 8-10 लोक राहू शकतात.
25 फेबुवारी 2021 रोजी भारतीय आणि पाकिस्तानी सैन्यादरम्यान संवेदनशील नियंत्रण रेषवरील तणाव कमी करण्यावर तसेच शस्त्रसंधीवर सहमती झाली होती. त्यापूर्वी 2020 मध्ये एलओसीवर पाकिस्तानने 5,133 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. पाकिस्तानच्या या गोळीबारात 46 जणांना जीव गमवावा लागला होता. 2019 मध्ये पाकिस्तानने 3,479 वेळा शस्त्रसंधीचा भंग केला होता. तर 2018 मध्ये प्रतिदिन सरासरी 8 वेळा पाकिस्तानकडून गोळीबार करण्यात आला होता.