मे महिन्यात रोजगाराच्या आघाडीवर शुभवार्ता
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
रोजगाराच्या आघाडीवर काही प्रमाणात दिलासा मिळू लागला आहे. कर्मचारी राज्य विमा निगम म्हणजेच ईएसआयसी संचलित सामाजिक सुरक्षा योजनेशी यंदा मे महिन्यात सुमारे 14.93 लाख नवे सदस्य जोडले गेले आहेत. ही आकडेवारी देशातील संघटित क्षेत्रात रोजगाराची स्थिती दर्शविणारी आहे.
नॅशनल स्टॅटिकल ऑफिस म्हणजेच एनएसओकडून सादर अहवालात ही आकडेवारी नमूद करण्यात आली आहे. यासंबंधी सोमवारी जारी अधिकृत आकडेवारीनुसार 2021-22 या आर्थिक वर्षात ईएसआयसीसोबत जोडले जाणाऱया एकूण नव्या सदस्यांची संख्या 1.49 कोटी झाली आहे. 2020-21 या आर्थिक वर्षात 1.15 कोटी नवे सदस्य जोडले गेले होते.
महामारीपूर्वीच्या 2019-20 या आर्थिक वर्षात 1.51 कोटी नवे सदस्य ईएसआयसीशी जोडले गेले होते. तर 2018-19 या आर्थिक वर्षात ही संख्या 1.49 कोटी राहिली होती. सप्टेंबर 2017 पासून मार्च 2018 दरम्यान सुमारे 83.55 लाख नवे सदस्य ईएसआयसीच्या सामाजिक सुरक्षा योजनेत जोडले गेले होते.
पेन्शन फंड बॉडी एम्प्लॉय प्रॉव्हिडेंट फंड ऑर्गनायझेशन म्हणजेच ईपीएफओसोबत मे महिन्यात 16.81 लाख नवे सदस्य जोडले गेले आहेत. सप्टेंबर 2017 पासून मे 2022 दरम्यान सुमारे 5.48 कोटी नवे सदस्य ईपीएफओ योजनेत सामील झाले. एनएसओचा हा अहवाल संघटित क्षेत्रात रोजगाराच्या विविध स्तरांशी निगडित वेगवेगळे पैलू अधोरेखित करणारा आहे.