पिंपळगाव/वार्ताहर
पिंपळगाव(ता.भुदरगड)येथील जयसिंग लक्ष्मण बाबर यांच्या राहत्या घरी चोरी झाली असून चोरट्यांनी झोपण्याच्या बेडमधील कप्प्यातील एका छोट्या डब्यात ठेवलेले सुमारे १४ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले आहेत. चोरीचा प्रकार बुधवारी रात्री आठच्या सुमारास पत्नी आकाताई जयसिंग बाबर यांच्या लक्षात आला.लगेचच त्यांनी भुदरगड पोलिसांत तकार दिल्यानंतर पोलिसांनी घरी येऊन पाहणी केली.
येथील जयसिंग बाबर हे पत्नीसह लक्ष्मीपुरी येथील घरात राहतात.मुलगा बाहेरगावी नोकरीस असल्याने पती- पत्नी दोघेच घरी असतात.शनिवार दि.१ रोजी संध्याकाळी आकाताई बाबर या शेतातून घरी आल्यानंतर पती जयसिंग यांच्या गळ्यात घातलेली सोन्याची चैन नसल्याचे लक्षात आले असता त्यांनी त्याबाबत पतीला विचारले असता त्यांनी ती चैन काढून कपाटावर ठेवल्याचे सांगितले. यावेळी पत्नी आकाताई यांनी ती चैन घेऊन अन्य सोन्याचे सर्व दागिने असलेल्या ठिकाणी एका छोट्या डब्यात ती चैन ठेवली.त्यावेळी त्या डब्यात अन्य सर्व दागिने व्यवस्थित होते.
बुधवारी रात्री आठच्या सुमारास झोपण्याच्या बेडमधील कप्प्यात ठेवलेला दागिन्यांचा डबा त्याठिकाणी नसल्याचे आकाताई यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत पतीला माहिती देऊन दोघेजण सोन्याच्या दागिन्यांचा डबा शोधू लागले.या डब्यात आठ तोळ्यांच्या सोन्याच्या पाटल्या, दिड तोळ्याची टुसी, पावणेदोन तोळ्यांचा लक्ष्मीहार,दिड तोळ्यांची चैन असे सुमारे चौदा तोळे सोन्याचे दागिने होते.हा चौदा तोळे सोन्याचे दागिन्यांचा डबा ठेवलेल्या ठिकाणी नसल्याने दागिन्यांची चोरी झाल्याचे लक्षात आले.घरातील अन्य वस्तुंना चोरट्यांनी हात लावला नाही केवळ दागिन्यांचा ऐवज असलेला डबाच लंपास केला.आपल्या घरी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ही माहिती शेजारच्या लोकांना सांगितली. बुधवारी रात्री त्यांनी भुदरगड पोलिसांत आपल्या घरात चोरी झाली असल्याची तकार दिली. रात्री पोलिसांनी घरी येऊन पाहणी करून माहिती घेतली. गुरुवारी सकाळी श्वानपथक आणण्यात आले होते .अधिक तपास पोलिस निरीक्षक सतीश मयेकर करत आहेत.