सर्व योजनांच्या लाभार्थ्यांना सोमवारपर्यंत आर्थिक साहाय्य : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची माहिती
प्रतिनिधी / पणजी
विविध खात्यांतर्फे देण्यात येणाऱया कल्याणकारी योजनांचे आर्थिक साहाय्य व अनुदानाची रक्कम लाभार्थिना येत्या सोमवारपर्यंत देण्याचे निर्देश मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वित्त खात्याला जारी केले आहेत. सदर रक्कम लाभार्थिच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार असून राज्यातील एकूण 3.40 लाख कुटुंबाना मिळून रु. 142 कोटीची आर्थिक मदत पुरविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. ही गणेशचतुर्थीची खास भेट असल्याचे सांगून त्यांनी जनतेला चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
डॉ. सावंत यांनी फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधताना वरील माहिती देऊन पुढे सांगितले की, गोव्यात गणेशचतुर्थी हा प्रमुख आणि महत्त्वाचा उत्सव असून त्यासाठी सर्व कल्याणकारी योजनेच्या लाभार्थींना त्यांचे पैसे चतुर्थीपूर्वी मिळावेत म्हणून आढावा घेऊन तसे निर्देश दिले आहेत.
दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेच्या सुमारे 1.30 लाख लाभार्थिंना प्रत्येकी रु. 2000 तर गृहआधारच्या 1.35 लाख महिलांना गेल्या 3 महिन्यांचे मिळून प्रत्येकी 1500 प्रति महिना प्रमाणे रु. 4500 मिळणार आहेत. दूध उत्पादक शेतकरी, कृषी खाते, आदिवासी कल्याण खाते, वाहतूक-मच्छीमारी अशा विविध खात्याच्या योजनांची रक्कम संबंधित लाभार्थिंना सोमवारपर्यंत मिळणार असल्याची खात्री त्यांनी बोलताना दिली.