मेक्सिको सिटी / वृत्तसंस्था
मेक्सिकोच्या सॅन मिगुएल टोटोलापन शहरात झालेल्या गोळीबारात शहराच्या महापौरांसह किमान 18 जणांचा मृत्यू झाला आहे. शहरातील सिटी हॉलमध्ये एका कार्यक्रमादरम्यान सशस्त्र बंदूकधाऱयाने गोळीबार सुरू केला. यात काही पोलीस अधिकारीही गोळीबाराचे बळी ठरले आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
गोळीबार झालेल्या ठिकाणी आयोजित कार्यक्रमाला किमान 200 लोक उपस्थित होते असे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका अज्ञात व्यक्तीने हॉलमध्ये घुसून गोळीबार सुरू केला. या घटनेनंतर संपूर्ण शहरात लष्कर तैनात करण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांतील सामूहिक गोळीबाराची ही तिसरी घटना आहे. सभागृहाबाहेरील भागाची गोळीबारानंतरची छायाचित्रे समोर आली असून भिंतींवर गोळय़ांच्या खुणा स्पष्टपणे दिसत आहेत. तसेच यासंबंधीचा एक व्हिडीओ समोर आला असून त्यामध्ये पोलिसांनी हल्लेखोराला पकडल्याचे स्पष्ट झाले आहे. पकडण्यात आलेल्या व्यक्तीची कसून चौकशी सुरू करण्यात आली आहे.