वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
मेघालयमध्ये भाजप अधिकच मजबूत झाले आहे. राज्यातील 4 आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत. एनपीपीचे दोन, तृणमूल काँग्रेसचा एक तसेच एक अपक्ष आमदाराने भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. चारही आमदारांनी दिल्लीतील भाजप कार्यालयात पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले आहे. फेरलीन, संगमा, सॅम्युअल संगमा, बेनेडिक माराक आणि एच.एम. शांगप्लियांग यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यावेळी आसामचे मुख्यमंत्री हेमंत विश्व शर्मा, भाजप नेते संबित पात्रा आणि अनिल बलूनी उपस्थित होते. चारही आमदार भाजपमध्ये सामील झाल्याने पक्षाला अधिक मजबुती मिळणार आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱया विधानसभा निवडुकीत मोठे यश मिळणार असल्याचे उद्गार शर्मा यांनी काढले आहेत. मेघालय विधानसभेचा कार्यकाळ 15 मार्च 2023 रोजी समाप्त होणार आहे. नॅशनल पीपल्स पार्टीचे सरकार राज्यात असून कॉनराड संगमा हे मुख्यमंत्री आहेत.