पूर्ण जग कोरोनाच्या खात्म्यावरून चिंतेत आहे. अनेक ठिकाणी होम-यज्ञ सुरू आहेत, तर वैद्यकीय शास्त्र महामारी संपविण्यासाठी संशोधन करत आहे. तर जपानमध्ये बुद्धांच्या एका पुतळय़ावर फेसमास्क लावण्यात आला आहे. एका प्रार्थनेदाखल असे करण्यात आले आहे. ही प्रार्थना कोरोना महामारीच्या उच्चाटनासाठी करण्यात आली होती.
पुतळय़ावर मास्क लावण्यासाठी 3 तासांहून अधिक कालावधी लागला आहे. चार जणांनी मिळून हे काम पूर्ण पेले आहे. दोरखंडांच्या मदतीने ते पुतळय़ाच्या चेहऱयापर्यंत पोहोचले आणि त्यांनी 187 फूट उंचीच्या या पुतळय़ाला फेसमास्क लावला आहे. हा पुतळा फुकुशिमा येथील एका मंदिर परिसरात उभारण्यात आला आहे.
गुलाबी रंगाच्या नेट फॅब्रिकचा मास्क बुद्धांच्या पुतळय़ावर लावण्यात आला आहे. हा मास्क 13.45 फुट गुणिले 17.83 फुटांचा आहे. या मास्कचे वजन सुमारे 34 किलो इतके होते. हा पुतळा 33 वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता. याच्या आतमध्ये जिना असून जो पुतळय़ाच्या खांद्यापर्यंत जातो.
लोक या पुतळय़ाच्या परिसरात अपत्यांच्या कामनेसाठी पोहोचत असतात. या पुतळय़ात बुद्धांनी हातात एका बाळाला घेतल्याचे दर्शविण्यात आले आहे. याचमुळे लोक येथे येऊन स्वतःच्या मुलांच्या आणि होऊ घातलेल्या अपत्यांच्या कुशलतेची प्रार्थना करतात.
जपानमध्ये कोरोना संसर्ग नियंत्रणात येत नाही तोवर पुतळय़ावर हा मास्क राहणार आहे. एकप्रकारे हा मास्क लोकांना मास्क लावून ठेवण्याचा संदेश देत असल्याचे उद्गार मंदिराचे व्यवस्थापक ताकोमी होरिगेन यांनी काढले आहेत.