दाक्षिणात्य सुपरस्टार पवन कल्याण यांच्या चाहत्यांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. दोन वर्षांच्या दीर्घ काळानंतर पवन यांचा चित्रपट वकील साबचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. पडद्यावर 24 महिन्यांपर्यंत दिसून न आल्यावर आता पवनकल्याण पॉवरपॅक कमबॅक करत असल्याचे दिसून येत आहे. चित्रपटाच्या ट्रेलरचे प्रेक्षक कौतुक करत आहेत. युटय़ूबपासून ट्विटरपर्यंत सर्वच वकीलसाबचा ट्रेलर ट्रेंड करत आहे.
चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी वकील साबचा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. ‘जर तुम्ही योग्य लोकांसोबत असाल तर न्यायच जिंकणार’ असे बोनी कपूर यांनी ट्रेलर शेअर करत नमूद केले आहे. अभिनेता रामरचण यांनी ट्रेलरचे आणि काका पवनकल्याण यांचे कौतुक केले आहे. गायक अरमान मलिकने वकीलसाबचा ट्रेलर अत्यंत प्रभावी असल्याचे म्हटले आहे.
पिंकचा तेलगू रिमेक
वेनू श्रीराम यांच्याकडून दिग्दर्शित वकील साब हा हिंदी हिट चित्रपट पिंकचा अधिकृत तेलगू रिमेक आहे. पिंक चित्रपटाप्रमाणेच याची कथा तीन महिला व्यक्तिरेखेभोवती गुंफण्यात आली आहे. तर पवन कल्याण वकिलाच्या भूमिकेत असून ती मुलींसाठी न्यायाची लढाई लढत असल्याचे दाखविण्यात आले आहे. पवन कल्याणसह प्रकाश राज, निवेदिता थॉमस, अंजली, अनन्या नगल्ला, नरेश, देव गिल तसेच श्रूती हसन या चित्रपटात दिसून येणार आहे.