राधानगरी /प्रतिनिधी
Radhanagari Dam Two automatic gates closed : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात आज पावसाचा जोर ओसरला, दिवसभरामध्ये फक्त दोन मिलिमीटर पाऊस झाल्याने धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले. सायंकाळनंतर पावसाने उघडीप दिल्याने मध्यरात्रीपर्यंत विसर्ग कमी होण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे.
धरण पाणलोट क्षेत्रात आज सकाळपासून पावसाचा जोर काहीसा कमी होता. दुपारनंतर पूर्णपणे उघडीप दिल्याने दुपारी बारा वाजता स्वयंचलित द्वार क्रमांक तीन बंद झाले तर तीन वाजून 40 मिनिटांनी स्वयंचलित द्वार क्रमांक चार बंद झाले. विसर्ग सुरू असणाऱ्या चार पैकी दोन दरवाजे बंद झाले आहेत. स्वयंचलित द्वार क्रमांक पाच आणि सहा उघडे आहेत. या दोन दरवाज्यातून 2856 क्युसेक्स आणि वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स असा एकूण 4456 क्यूसेक्स पाण्याचा भोगावती नदीपात्रात विसर्ग सुरू आहे. आज दुपारी चार वाजता धरणाची पाणी पातळी 346.95 फूट इतकी होती. दिवसभरातील आठ तासांमध्ये फक्त दोन मिलिमीटर पाऊस झाल्याने आणि सायंकाळ नंतर पावसाने पूर्णपणे उघडी दिल्याने मध्यरात्रीपर्यंत दोन दरवाजा पैकी एक दरवाजा बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे धरणातून होणारा विसर्ग कमी होण्याचा अंदाज जलसंपदा विभागाने व्यक्त केला आहे.