जर्मनीच्या वैज्ञानिक दाम्पत्याला यश
वृत्तसंस्था / बर्लिन
कोरोना विषाणूवरील उपचार शोधताना जर्मनीच्या वैज्ञानिक दांपत्याला कर्करोगावरील उपाय गवसला आहे. बायोएनटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. उगर साहिन आणि त्यांच्या पत्नी डॉ. ओजलेम तुरेसी यांनी शरीराच्या प्रतिरोधक तंत्राला टय़ुमरशी लढण्यास सक्षम करण्याची पद्धत शोधून काढली आहे. हे दांपत्य आता याची लस निर्मितीसाठी प्रयत्नशील आहेत. सर्व काही सुरळीत राहिल्यास आगामी दोन वर्षांमध्ये कर्करोगावरील लसही उपलब्ध करू असे त्यांचे म्हणणे आहे. दाम्पत्य मागील 20 वर्षांपासून कर्करोगावरील उपचारासाठी संशोधन करत आहे.
बायोएनटेकची कोविड-19 ची लस मेसेंजर आरएनएच्या मदतीने मानवी शरीराला प्रतिरोधक प्रणालीला विषाणूवर वार करण्यास सक्षम करणाऱया प्रोटीनच्या उत्पादनाचा संदेश देतो. एम-आरएनए जेनेटिक कोडचा छोटा हिस्सा असतो, जो पेशींमध्ये प्रोटीनची निर्मिती करतो. याचा वापर प्रतिकार क्षमतेला सुरक्षित अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी प्रेरित करतो आणि यासाठी त्याला खऱया विषाणूचीही गरज भासत नाही.
कोरोना लस तयार करण्यादरम्यान याच आधारावर कर्करोगाला पूर्णपणे संपविण्यासाठी काही लसी तयार केल्या आहेत. आता आम्ही याचे लवकरच वैद्यकीय परीक्षण करणार आहोत. एम-आरएनए आधारित लस कर्करोगाची लागण होण्यापूर्वीच शरीराला त्याच्याशी लढण्याचे बळ देणार असल्याचे आतापर्यंतच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. म्हणजेच आता कर्करोगाच्या रुग्णांना कीमोथेरपी आणि रेडिओथेरपीमुळे होणाऱया असहय़ वेदनांपासून मुक्ती मिळणार आहे. तसेच केस गळणे, भूक नाहिशी होणे, वजन कमी होणे इत्यादी समस्यांपासूनही मुक्तता होणार असल्याचे दांपत्याने म्हटले आहे.
ऑक्सफोर्डच्या वैज्ञानिकांकडून संशोधन
कोरोना लस निर्मितीत सहभागी ऑक्सफोर्डचे वैज्ञानिक प्राध्यापिका सारा गिल्बर्ट आणि एड्रियान हिल हे देखील कर्करोगावरील उपचारात एम-आरएनए तंत्रज्ञानाचा वापर करण्याच्या प्रयत्नात आहेत. त्यांनी फुफ्फुसांच्या कर्करोगाने ग्रस्त रुग्णांवर एम-आरएनए आधारित लसीच्या परीक्षणाची तयारी पूर्णही केली आहे. त्यांनी ‘व्हॅक्सिटेक’ नावाची कंपनी स्थापन केली असून ती प्रोस्टेट कर्करोगाच्या उपचारात उपयुक्त लसीवर पूर्वीपासूनच काम करत आहे. प्रारंभिक प्रयोगात या लसीचे अत्यंत सकारात्मक निष्कर्ष प्राप्त झाले आहेत.