- एफडीएची आंतरराज्यीय कारवाई
ऑनलाईन टीम / मुंबई :
अन्न व औषध प्रशासनाने केलेल्या कारवाईत डोंबिवली व सुरतमधून 20 लाखांचे बनावट हॅण्ड सॅनिटायझर जप्त करण्यात आले. ही कारवाई महाराष्ट्र आणि गुजरात एफडीएने मिळून केली. यात डोंबिवलीतून 6.80 लाखांचे तर सुरतमधून 13 लाखांचे सॅनिटायझर जप्त केले. अन्न व औषध प्रशासन महाराष्ट्र राज्य नियमितपणे आंतरराज्य औषध नियंत्रण विभागांशी समन्वय ठेवून औषध विषयक बेकायदेशीर कामांची माहितीचे वेळोवेळी आदानप्रदान करून कारवाई करत असते.
अन्न व औषध प्रशासनाच्या दक्षता-गुप्तवार्ता विभागास डोंबिवलीत काही विक्रेत्याकडे बनावट हँड सॅनिटीझर उपलब्ध असल्याची माहिती मिळाली. यावर संशयास्पद उत्पादन परवाना क्रमांक होता. तर उत्पादकाचे नाव व पत्ता नसल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पडताळणी करून गुप्तवार्ता विभाग आणि ठाणे परिमंडळ 6 व 7 च्या औषध निरीक्षकांनी डोंबिवली पूर्वेकडील सरस्वती कॉलनीतील शुगर सेंटर आणि आर. आर. इस्टेट एजन्सी या दोन ठिकाणी छापा टाकला. त्यांच्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेला आरुष हँड सॅनिटीझरचा सुमारे 6.80 लाख रुपयांचा साठा, खरेदी बिल जप्त केला. हा साठा सुरतमधील मे. जे. पी. पेंट अँड केमिकल यांच्याकडून आणला असल्याचे सांगितले. मात्र उत्पादनावरील नमूद उत्पादन परवाना क्रमांक हा गुजरातच्या अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाने दिला नसल्याचे प्राथमिक चौकशीत आढळले. पुढे या उत्पादनाची माहिती तातडीने गुजरात एफडीए प्रशासनला कळवली.
त्यानुसार सुरत अन्न व औषध नियंत्रण प्रशासनाच्या पथकाने 3 डिसेबरला जे. पी. पेन्ट अँड केमिकल्स येथे छापा घातला. यावेळी विनापरवाना उत्पादित हँड सॅनिटीझर व हँड वॉशचा सुमारे 13 लाखांचा साठा जप्त केला. यावेळी उत्पादककडे उपलब्ध परवाना प्रत व इतर प्रमाणपत्र बनावट असल्याचे निदर्शनास आले. डोंबिवलीतील कारवाईमध्ये ठाणे कार्यालयाचे औषध निरीक्षक शीतल देशमुख, नितीन अहेर व गुप्तवार्ता (औषधे) शाखेचे औषध निरीक्षक, सहाय्यक आयुक्त यांनी सहभाग घेतला. ही कारवाई आयुक्त अभिमन्यू काळे, सहआयुक्त (दक्षता) सुनील भारद्वाज, सह आयुक्त (औषधे) कोकण विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
अशीच आंतरराज्यीय कारवाईत केरळ एफडीएने ही विनापरवाना उत्पादन कारखाना शोध घेऊन जप्ती कारवाई घेण्यात आली होती. संशयास्पद औषधबाबतची माहिती आढळल्यास प्रशासनाच्या टोल फ्री क्रमांक 1800222365 वर कळविण्याचे आवाहन एफडीएकडून करण्यात आले आहे.