वृत्त संस्था/ स्कोपजे
कतारमध्ये 2022 साली होणाऱया फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी जर्मनीने आपली पात्रता सिद्ध केली आहे. या स्पर्धेसाठी पात्र ठरणारा जर्मनीचा हा पहिला युरोपियन संघ आहे. सोमवारी झालेल्या गट-जे मधील सामन्यात जर्मनीने नॉर्थ मॅसेडोनियाचा 4-0 अशा गोलफरकाने दणदणीत पराभव केला. या गटात जर्मनीचा संघ आता पहिल्या स्थानावर असून त्यांचे पात्र फेरीतील दोन सामने बाकी आहेत.
पात्र फेरीच्या या स्पर्धेतील गट-जे मधील गुणतक्त्यात जर्मनीने 21 गुणांसह पहिले स्थान मिळविले असून रूमानिया 13 गुणांसह दुसऱया स्थानावर आहे. जर्मनीचा या गटातील हा पाचवा सामना होता. जर्मनीने आतापर्यंत या स्पर्धेत पाच सामने जिंकले आहेत. जर्मनी संघाला हॅन्सी फ्लिक हे नवे प्रशिक्षक लाभले आहेत. सोमवारी झालेल्या सामन्यात जर्मनीतर्फे उत्तरार्धात टिमो वेर्नरने दोन गोल तर केई हॅव्हर्ज आणि जमाल मुसालिया यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. युरोपियन विभागातील पात्र फेरीच्या स्पर्धेत विविध गटातील विजेते संघ 2022 कतार फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेसाठी थेट प्रवेश करतील.
2018 साली झालेल्या फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत बलाढय़ जर्मनीचे आव्हान पहिल्याच फेरीत समाप्त झाले होते. गेल्या शुक्रवारी झालेल्या सामन्यात जर्मनीने रूमानियावर 2-1 अशी मात केली. गेल्या मार्चमध्ये झालेल्या सामन्यात नॉर्थ मॅसेडोनियाने जर्मनीचा 2-1 असा पराभव केला होता.
पात्र फेरीच्या स्पर्धेतील सोमवारी झालेल्या ह गटातील सामन्यात क्रोएशियाला स्लोव्हाकियाने 2-2 असे बरोबरीत रोखल्याने क्रोएशिया संघाची पुढीलवर्षी होणाऱया फिफाच्या विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेतील प्रवेशाचा आशेला मोठा धक्का बसला आहे. रशियाने च गटात आठ सामन्यांतून 19 गुण मिळविले आहेत. रशियाने स्लोव्हेनियाचा 2-1 अशा गोलफरकाने पराभव केला.