नुकत्याच निधन पावलेल्या ब्रिटनच्या महाराणी क्वीन एलिझाबेथ (दुसऱया) यांची जेवणाची भांडी आणि इतर आहार साधने 222 वर्षे जुनी होती, अशी माहिती प्रसिद्ध झाली आहे. तसेच त्यांनी आपला आहार महाराणी झाल्यापासून म्हणजे गेली जवळपास 70 वर्षे तोच ठेवला होता. त्यांच्या महाराणीपदाचा अमृत महोत्सव साजरा करण्याची तयारी चाललेली होती. तथापि नियतीने ब्रिटनच्या नागरिकांना तो दिवस दाखविला नाही. त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले.
महाराणींची जेवणाची भांडी आणि आहार साधने इ. स. 1800 मध्ये चांदी आणि इतर मौल्यवान धातूंपासून बनविण्यात आली होती. याच भांडय़ांमध्ये गेली 222 वर्षे त्यांचा आहार तयार केला जात होता. आणि जेवणासाठीही याच भांडय़ांचा उपयोग केला जात होता. ही भांडे स्वच्छ करणे आणि त्यांची सुरक्षा ठेवणे यासाठी बकिंगहॅम राजवाडय़ात विशेष कर्मचारी वर्ग नियुक्त केलेला होता.
महाराणींचा आहारही गेली 70 वर्षे समानच होता. त्या सकाळी उठताच बिनसाखरेचा कोरा चहा आणि बिस्किटे असा न्याहरीपूर्व आहार घेत असत. चहासाठी विशेष चांदीची भांडी होती. सकाळी 8.30 वाजता फळे, सिरियल्स, मामलेट इत्यादी पदार्थ नाष्टय़ासाठी असत. मामलेट म्हणजे संत्र्याचा मुरंबा त्यांच्या विशेष आवडीचा असे. तर दुपारच्या जेवणासाठी त्या प्रोटीनयुक्त आणि कमी कार्बोदके असणारा तसेच बिनास्टार्च आहार घेत असत. मासे आणि भाज्या हा दुपारच्या जेवणाचा मुख्य भाग असे. त्याबरोबरच सॅलड, ग्रील्ड चिकन, ग्रील्ड डोहरसोल इत्यादी पदार्थ असत. त्यांचे जेवण बनविताना कठोर नियमांचे पालन केले जात असे. असा आहार हेच त्यांच्या दीर्घायुष्याचे रहस्य होते.