दोन्ही रुग्ण ब्रिटनमधून दाखल झालेले नागरिक : जगभरात 81,38,820 बाधित : 4,39,590 जणांचा मृत्यू
जगभरात कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 4 लाख 39 हजार 590 जणांचा मृत्यू ओढवला आहे. तर बाधितांचा एकूण आकडा 81 लाख 38 हजार 820 वर पोहोचला आहे. कोरोना संसर्गावर आतापर्यंत 43 लाख 95 हजार 90 बाधितांनी यशस्वी मात केली आहे. कोरोनामुक्त म्हणवून घेतलेल्या न्यूझीलंडमध्ये 24 दिवसांनी दोन बाधित सापडले आहेत. परंतु दोन्ही रुग्ण स्थानिक नाहीत. दोन्ही रुग्ण ब्रिटनमधून देशात दाखल झाले होते. युरोप तसेच अमेरिकेतील कोरोनाचा असलेला केंद्रबिंदू आता दक्षिण अमेरिका आणि दक्षिण आशियात निर्माण होत असल्याचे चित्र सद्यस्थितीत दिसून येत आहे.
न्यूझीलंडमध्ये स्क्रीनिंग
ब्रिटनमधून दाखल झालेल्या 2 जणांना चाचणी अहवाल सोमवारी रात्री पॉझिटिव्ह आला आहे. आरोग्य मंत्रालयाने दोन्ही रुग्णांची मंगळवारी पुष्टी दिली आहे. देशात एकूण 1,156 बाधित सापडले असून 22 जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील 80 टक्के निर्बंध हटविण्यात आले आहेत. विदेशातून येणाऱया प्रत्येकाची चाचणी केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
इजिप्त : दिवसात 97 बळी
इजिप्तमध्ये दिवसभरात 97 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. तर बळींचा एकूण आकडा 1,672 झाला आहे. मागील 24 तासांत 1,691 नवे रुग्ण सापडल्याने बाधितांचे एकूण प्रमाण 46 हजार 289 वर पोहोचले आहे. यातील 12 हजार 329 जणांना संसर्गापासून मुक्तता मिळाली आहे. इजिप्त जागतिक आरोग्य संघटनेच्या संपर्कात आहे. देशात पहिला रुग्ण 14 फेब्रुवारी सापडला होता.
इस्रायल : 182 नवे रुग्ण
इस्रायलच्या आरोग्य मंत्रालयानुसार 24 तासांत 182 नवे रुग्ण सापडले आहेत. याचबरोबर बाधितांचा एकूण आकडा 19 हजार 237 झाला आहे. तर 26 वर्षीय युवकाचा मृत्यू ओढवला आहे. देशात आतापर्यंत 15 हजार 415 बाधितांनी संसर्गापासून मुक्ती मिळविली आहे. देशभरातील शाळा आता 20 जूनऐवजी 1 जुलैपर्यंत सुरू केल्या जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.
काही भागांमध्ये टाळेबंदी
बीजिंगमध्ये कोरोना संसर्गाची दुसरी लाट समोर आल्यावर प्रशासनाने कठोर पावले उचलली आहेत. शहराच्या काही हिस्स्यांमध्ये टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. सर्व इनडोअर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, चित्रपटगृहे पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत. तेथे 4 दिवसांत एकूण 106 रुग्ण आढळून आले आहेत. शहरातील 46 हजार लोकांची चाचणी केली जाणार आहे.
अमेरिका : 21 लाखापार
जॉन हॉपकिन्स विद्यापीठानुसार अमेरिकेतील रुग्णांची संख्या 21,82,979 झाली आहे. न्यूयॉर्क प्रांतात सर्वाधिक 3 लाख 83 हजार 944 बाधित सापडले असून 30 हजार 825 जणांचा मृत्यू झाला आहे. न्यूजर्सी, कॅलिफोर्निया, इलिनोइस आणि मॅसाच्युसेट्समध्ये 1 लाखापेक्षा अधिक रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेत कृष्णवर्णीयांच्या निदर्शनानंतर रुग्ण वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. न्यूयॉर्कमध्ये या निदर्शनांमध्ये भाग घेणाऱया नागरिकांना कोरोनाची चाचणी करवून घेण्याची सूचना करण्यात आली आहे.
औषधाचा शोध संपला?
कोरोना विषाणूच्या संसर्गापासून रुग्णांना वाचविणारे औषध सापडल्याचा दावा ब्रिटनमधील वैज्ञानिकांनी केला आहे. डेक्सामेथासोन नावाच्या स्टेरॉइडच्या वापरातून गंभीर रुग्णांचा मृत्यूदर एक तृतीयांशने घटला आहे. लवकरच या औषधासंबंधी एक संशोधनपत्र प्रकाशित केले जाणार आहे. डेक्सामेथासोनच्या वापरामुळे गंभीर रुग्णांचा जीव वाचविता येत असल्याचे म्हटले जातेय.
चीन अन् अमेरिकेचा निर्णय
चीन आणि अमेरिकेदरम्यान तणावाचे संबंध असताना एक चांगले वृत्त समोर आले आहे. आठवडय़ातून 4 विमानोड्डाणे सुरू करण्याचा निर्णय दोन्ही देशांनी घेतला आहे. दर आठवडय़ाला अमेरिकेतून 4 विमाने चीनमध्ये दाखल होणार आहेत. चीनमधून एवढीच विमानोड्डाणे अमेरिकेसाठी होणार आहेत. सिएटल आणि डेट्रॉयटमधून ही विमानसेवा सोलमार्गे चीनकरता सुरू होणार आहे.
पाकिस्तान : मंत्र्याला लागण
पाकिस्तानचे दूरसंचार मंत्री सैयद अमिनुल हक यांना कोरोनाची लागण झाली आहे. यापूर्वी माजी पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासी आणि युसूफ रझा गिलानी हे देखील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. नवाज शरीफ यांचे बंधू शाहबाज यांनाही महामारीची बाधा झाली आहे. देशात आतापर्यंत 4 खासदारांसह एका प्रांताच्या मंत्र्याचा मृत्यू ओढवला आहे.\