प्रतिनिधी /मडगाव
मडगाव पालिकेचे मुख्याधिकारी आग्नेलो फर्नांडिस यांनी सोमवारी पत्रकारांना माहिती दिली की, गोवा विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्या कार्यालयाने मडगाव पालिकेच्या आवश्यक परवानगीशिवाय पालिका हद्दीत प्रदर्शित केलेल्या सर्व होर्डिंग्स आणि बॅनर्सचे सर्वेक्षण करावे असे निर्देश कर्मचाऱयांना दिले आहेत. राजकीय पक्षांसह सामान्य जनतेला त्यांनी सतर्क करताना म्हटले आहे की, आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करण्यास पालिका बांधील आहे. त्यामुळे उल्लंघन करणाऱयांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल.
फर्नांडिस यांनी दिलेल्या माहितीनुसार, पालिकेच्या संबंधित कर्मचाऱयांना कडक सूचना देण्यात आल्या आहेत की, आचारसंहिता लागू होण्यापूर्वी पालिका हद्दीतील सर्व सार्वजनिक क्षेत्रातील विनापरवाना होर्डिंग्स व बॅनर्स हटवावेत. लवकरच गोवा विधानसभेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत. यासंबंधी गांभीर्य अधोरेखित करण्यासाठी मुख्याधिकाऱयांनी गोवा विद्रुपीकरण प्रतिबंधक कायद्याच्या एस-5 कलमाचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये असे म्हटले आहे की, नियमांचे उल्लंघन करणाऱयाला सहा महिने तुरुंगवास भोगावा लागेल. पालिकेच्या आवश्यक परवानगीशिवाय ज्यांनी कोणतेही पोस्टर, कटआऊट किंवा कोणतीही जाहिरात सामग्री प्रदर्शित केली आहे त्यांना या सूचनेनंतर 24 तासांच्या आंत अशा जाहिराती काढून टाकण्याचे निर्देश दिले जात आहेत, असे मुख्याधिकाऱयांनी स्पष्ट केले.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर होर्डिंगचा कोणताही परवाना अस्तित्वात राहणार नाही. कारण आचारसंहिता लागू झाल्यानंतर कोणत्याही राजकीय पक्षाच्या होर्डिंगसाठी किंवा कोणत्याही विशिष्ट उमेदवाराला मतदान करण्यास सांगण्यासाठी निवडणूक अधिकाऱयांची परवानगी आवश्यक असेल, असे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.
आताच काळजी घ्या, नंतर उल्लंघन सहन करणार नाही
गोव्यात आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय पक्षांच्या त्या जाहिराती काढून टाकल्या जातील ज्या निवडणूक अधिकाऱयांच्या परवानगीशिवाय उभारल्या गेल्या आहेत. निवडणूक कालावधीतील सर्व नियम, विशेषतः आचारसंहितेचे पालन केले जाईल याची खात्री करा, नंतर पालिका कोणतेही उल्लंघन सहन करणार नाही, असे मुख्याधिकारी फर्नांडिस यांनी सांगितले.