चार मतदारसंघांच्या आजी-माजी आमदार, इतर नेत्यांकडून जोरदार मोर्चेबांधणी, माजी जिल्हा पंचायत सदस्यही रिंगणात
वार्ताहर /केपे
केपे तालुक्यात एकूण 11 पंचायतींचा समावेश असून त्या केपे, कुडचडे, सांगे व पुंकळ्ळी अशा चार मतदारसंघांत समाविष्ट असल्याने चारही मतदारसंघांचे आजी-माजी आमदार व इतर नेते आपले समर्थक पंच निवडून आणून पंचायतीत आपला दबदबा कायम ठेवण्याकरिता जोरदार मोर्चेबांधणी करताना दिसत आहेत. 11 पंचायतींतून 240 उमेदवार रिगणात उतरलेले आहेत. यापैकी मोरपिर्ला, नाकेरी बेतूल व शेल्डे पंचायतींचे सरपंचपद, तर आंबावली, अवेडे कोठंबी, बाळ्ळी व बार्से या पंचायतींचे उपसरपंचपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.
चारपैकी कुडचडे व सांगे मतदारसंघांत भाजपचे आमदार असून ते मंत्री सुद्धा आहेत, तर कुंकळ्ळी व केपे मतदारसंघांत काँग्रेस आमदार आहेत. केपे मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री चंद्रकात कवळेकर पराभूत झालेले असले, तरी त्यांचा बराच प्रभाव आहे व राज्यात भाजप सत्तेवर असताना काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्ता यांच्यासाठी केपे मतदारसंघातील पंचायती काबिज करणे हे एक मोठे आव्हान राहणार आहे.
माजी जि. पं. सदस्य रिंगणात
त्याचबरोबर स्थानिक पातळीवरील अनेक नेते सक्रिय झाले असून यात प्रामुख्याने माजी जि. पं. सदस्य व माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांचे स्वीय सचिव राहिलेले प्रकाश अर्जुन वेळीप यांनी मोरपिर्ला पंचायतीच्या प्रभाग 4 मधून अर्ज सादर करून राजकारणात पुन्हा सक्रिय होण्याचे संकेत दिले आहेत. 2012 मध्ये विधानसभा निवडणूक लढवल्यानतर ते सक्रिय राजकारणापासून बरेच दूर गेले होते. पंचायत निवडणुकीत उतरून त्यांनी सर्वांनाच धक्का दिला आहे. दुसऱया बाजूने खोल पंचायतही केपे मतदारसंघात समाविष्ट असून तेथील माजी जि. पं. सदस्य कृष्णा वेळीप हे निवडणुकीत उतरले आहेत. या सर्व घडामोडींत काही स्थानिक भाजप पदाधिकारीही निवडणुकीत उतरलेले दिसत आहेत, तर दुसऱया बाजूने काँग्रेसचे आमदार एल्टन डिकॉस्ता यांचे बंधू सांजिल डिकाँस्ता हे रिंगणात उतरले आहेत.
बार्सेच्या बहुतेक प्रभागांत सरळ लढत
बार्से, मोरपिर्ला, फातर्पा, बेतूल या पंचायती आणि अवेडे कोठंबी व आंबावलीचा एक प्रभाग, तर बाळ्ळी पंचायतीचे काही प्रभाग हे केपे मतदारसंघात समाविष्ट आहेत. या सर्व पंचायतींचा आढावा घेता बार्से पंचायतीचे माजी सरपंच मालू वेळीप यांचा प्रभाग राखीव झाल्याने त्यांनी माघार घेतली आहे, तर मावळलेले सरपंच अर्जुन व़ेळीप प्रभाग 6 मधून निवडणूक लढत असून येथे सरळ लढत पाहायला मिळेल. ही पंचायत भाजपचा गड मानला जातो. त्यामुळे येथे भाजपला शह देण्याकरिता काँग्रेसने आपले उमेदवार रिगणात उतरविले आहेत. मात्र या पंचायतीत माजी मंत्री प्रकाश शंकर वेळीप यांचाही बराच प्रभाव आहे. त्यामुळे ते कोणाला पाठिंबा देतात याकडेही लक्ष लागणार आहे. या पंचायतीतील 9 प्रभागांतून 24 उमेदवार रिगणात उतरले असून बहुतेक प्रभागांत सरळ व काही प्रभागांत तिरंगी लढत आहे.
प्रकाश अर्जुन वेळीप यांची उमेदवारी चर्चेत
मोरपिर्ला पंचायतीत माजी जि. पं. सदस्य प्रकाश अर्जुन वेळीप हे निवडणूक लढवत असल्याने तो विषय बराच चर्चेत आहे. ते सक्रिय झाले, तर आजी-माजी आमदारांकरिता ती डोकेदुखी होऊ शकते. त्यामुळे त्यांच्या विरोधात अनेक जण सक्रिय होण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथील सातपैकी दोन प्रभागांत तिरंगी, तर राहिलेल्या प्रभागांत सरळ लढत पाहायला मिळू शकते. या पंचायतीतून 17 उमेदवार रिगणात उतरले आहेत.
फातर्पात काँग्रेस, भाजपाची प्रतिष्ठा पणाला
फातर्पात आमदार एल्टन डिकॉस्ता यांचे बंधू सांजिल डिकॉस्ता व राज्य भाजप सचिव आणि माजी सरपंच मेंदिनी नाईक यांच्यात सरळ लढत होण्याची शक्यता आहे. यात डिकॉस्ता यांच्या बंधूची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, तर दुसऱया बाजूने मेदिनी नाईक यांच्यासाठी भाजपाचे राज्यस्तरावरील नेते किती लक्ष घालतात ते पाहण्यासारखे आहे. प्रभाग 4 मध्ये कवळेकर यांचे समर्थक असलेले खुशाली नाईक देसाई, केपे महिला मोर्चा अध्यक्षा शीतल नाईक, युवा मोर्चा अध्यक्ष विराज देसाई हे आमने सामने आल्याने कवळेकर यांची बरीच पंचाईत झाली आहे. या पंचायतीकरिता भाजप, काँग्रेसने कंबर कसल्याचे कळते. येथील सात प्रभागांतून 18 उमेदवार <रिंगणात आहेत.
बाळ्ळीत भाजप पदाधिकारी रिंगणात
बाळ्ळी पंचायतीच्या प्रभाग 7 मधून अंजू मालू वेळीप या बिनविरोध निवडून आल्या आहेत. तर प्रभाग 2 मधून भाजपाच्या राज्य अनुसूचित जमाती मोर्चाचे अध्यक्ष प्रभाकर गावकर यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रभाग 8 मधून भाजप मंडळ अध्यक्ष संजय वेळीप, तर प्रभाग 4 मधून माजी सरपंच गोविंद फळदेसाई उतरले आहेत. एकूण नऊ प्रभागांतून 29 उमेदवार रिंगणात आहेत.
बेतूलमध्ये भाजप-काँग्रेस सरळ लढत
अवेडे-कोठबी पंचायतीत भाजप, काँग्रेससोबत आरजी पक्षही आपला दम दाखवण्याच्या तयारीत आहे. येथील सात प्रभागांतून 29 उमेदवार आपले नशिब आजमावत आहेत. बेतूल ही चंद्रकांत कवळेकर यांचा दबदबा असलेली पंचायत असून या पंचायतीत भाजप-काँग्रेस समर्थकांमध्ये सरळ लढत होणार असे मानले जाते. येथील सात प्रभागांत 18 उमेदवार असून बहुतेक प्रभागांत सरळ लढत आहे. आंबावली पंचायतीच्या सात प्रभागांपैकी प्रभाग 1 पेपे मतदारसंघात समाविष्ट असून येथे मावळलेल्या सरपंच जेन्सिता डायस निवडणूक लढवत आहेत. प्रभाग 4 मधून स्व. प्रकाश गावकर यांच्या कन्या प्रीती गावकर रिंगणात उतरल्या असून त्या केपे तालुक्यातील सर्वांत कमी वयाच्या (22 वर्षे) उमेदवार आहेत. येथील सात प्रभागांत 19 उमेदवार असून बहुतेक ठिकाणी सरळ लढत पाहायला मिळेल.
कावरेपिर्लात मंत्री फळदेसाईंचा विरोधकांना धक्का
कावरेपिर्ला व मळकर्णे या दोन पंचायती सांगे मतदारसंघात येतात. सांगेचे आमदार व मंत्री सुभाष फळदेसाई यांनी कावरेपिर्ला पंचायतीत सातपैकी तीन उमेदवार बिनविरोध निवडून आणून विरोधकांना निवडणुकीपूर्वीच धक्का दिला आहे. यात प्रभाग 4 मधून दत्तेश गावकर, 5 मधून माधुरी देविदास, तर 6 मधून विधी वेळीप या बिनविरोध निवडून आल्या आहेत. राहिलेल्या चार प्रभागांत नऊ उमेदवार असून बहुतेक प्रभागांत सरळ लढत होईल.
मळकर्णेत आरक्षणाचा अनेकांना फटका
मळकर्णे पंचायतीत आरक्षणाचा फटका अनेकांना बसला असून यात प्रामुख्याने सावित्री कवळेकर यांचे समर्थक संदीप मळकर्णेकर तसेच जितेंद्र पाटील यांचा समावेश आहे. माजी आमदार प्रसाद गावकर यांचे बंधू संदेश गावकर यांनीही निवडणूक न लढवता माघार घेतली आहे. मात्र येथे भाजपविरोधी गट एकत्र आल्याचे कळते. पण ते भाजपला कितपर्यंत शह देतात हे पाहण्यासारखे आहे. येथील सात प्रभागांतून 16 उमेदवार असून बहुतेक ठिकाणी सरळ लढत आहे. येथेही मंत्री फळदेसाई दबदबा कायम राखतात की विरोधी गट बाजी मारतो हे येणाऱया दिवसांत कळेल.
शेल्डेत भाजपाला जोरदार टक्कर
शेल्डे व असोल्डा या पंचायती कुडचडे मतदारसंघात समाविष्ट होतात. खास करून शेल्डेत भाजपला संघर्ष करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. येथे 11 प्रभागांतून 44 उमेदवार रिगणात उतरले असून भाजपला टक्कर देण्यासाठी काँग्रेसशिवाय आरजी व आप पक्षांचे समर्थक रिगणात आहेत. यात आपचे कुडचडेतील उमेदवार राहिलेले जेम्स फर्नांडिस हे माजी मंत्री डॉमनिक फर्नांडिस यांचे पुत्र व मावळलेले पंच जोहान फर्नांडिस यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. आजी -माजी सरपंच, पंच या निवडणुकीत आपले नशीब आजमावत असून कोण बाजी मारेल हे सांगता येत नाही. तर असोल्डा पंचायतीत सात प्रभागांतून 18 उमेदवार रिंगणात असून बहुतेक ठिकाणी सरळ लढत पाहायला मिळेल.